म्हाडाची साईट दुस-या दिवशीही हँग

मुंबईत म्हाडाच्या घरांसाठी अर्ज भरण्यासाठी जाहीरात प्रसिद्ध केल्यानंतर म्हाडाचा सावळागोंधळ सुरू झालाय. अर्ज भरण्याच्या दुस-या दिवशी म्हणजे आजही म्हाडाची साईट हँग आहे. काल अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी म्हाडाची वेबसाईट हँग झाली होती.

Updated: May 4, 2012, 09:43 AM IST

www.24taas.com, मुंबई

 

 

मुंबईत म्हाडाच्या घरांसाठी अर्ज भरण्यासाठी जाहीरात प्रसिद्ध केल्यानंतर म्हाडाचा सावळागोंधळ सुरू झालाय. अर्ज भरण्याच्या दुस-या दिवशी म्हणजे आजही म्हाडाची साईट हँग आहे. काल अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी म्हाडाची वेबसाईट हँग झाली होती. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी तयारीत असलेल्या लाखो लोकांची पुरती निराशा झाली. सॉफ्टवेअरच्या गोंधळामुळे इच्छुकांना अर्जच उपलब्ध झाले नाहीत...आजही साईट हँग असल्यानं अर्ज कसा भरायचा असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

 

 

एकीकडे म्हाडीची वेबसाईट हँग झालेली असतांना दुसरीकडे म्हाडाच्या घरांच्या किंमती पाहिल्यानंतर सर्वसमान्यांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आलीये. म्हाडाच्या अल्प उत्पन्न गटासाठी 269चौरस फुटाच्या जागेसाठी 15 लाख रुपये मोजण्याची तयारी आता करावी लागणार आहे. बांधकामाचा खर्च वाढल्याने घरांच्या किंमती वाढल्याचं म्हाडानं स्पष्ट केले आहे. 2593 घरांसाठीची म्हाडाची लॉटरी 31 मे ला फुटणार आहे. मात्र या लॉटरीमध्ये सहभागी व्हायचं की नाही असा प्रश्न घरांच्या किंमती बघून सर्वसामान्यांना पडल्याशिवाय राहणार नाही.

 

 

226 चौरस फुटाच्या मीरा रोड इथल्या घरासाठी 8 लाख 88 हजार 100 रुपये मोजण्याची तयारी अत्यल्प उत्पन्न गटामधल्या लोकांना करावी लागणार आहे. विनोबाभावे नगर, कुर्ला इथल्या 269 चौरस फुटाच्या अल्प उत्पन्न गटाच्या घरासाठी 15 लाख रुपये आणि 305 चौरस फुटासाठी 19 लाख 36 हजार 700 रुपये मोजावे लागतील.. मध्यम उत्पन्न गटातील लोकांना 660 चौरस फुटाच्या घरांसाठी तब्बल 48 लाख रुपये भरावे लागणार आहेत. उच्च उत्पन्न गटातील लोकांना 700 चौरस फुटाच्या घरांसाठी 54 लाखांपासून ते 57 लाख रुपये देण्याची तयारी ठेवावी लागणार आहे.  या किंमती लक्षात घेता म्हाडाच्या घरांच्या किंमतीही आता आवाक्याबाहेर गेल्याचं स्पष्ट झाले आहे.

 

 

मुंबई शहर आणि उपनगरांत बिल्डरांनी घरांच्या किंमती सर्वसामान्यांच्या कल्पनेपलिकडे याआधीच नेल्या आहेत. त्यातच म्हाडानेही सर्वसामान्यांची साथ सोडल्याचं जाहीर झालेल्या लॉटरीतील घरांच्या किंमतीवरून स्पष्ट झालंय. यामुळे मुंबईत घर घेणं आता सर्वसामान्यांसाठी स्वप्नंच ठरणार आहे.