मुंबई गँगरेप : `ती`च्या आईचे कॉल नराधमांनी उचलले होते

By Shubhangi Palve | Last Updated: Saturday, August 24, 2013 - 16:13

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबई बलात्कार प्रकरणासंबंधी धक्कादायक माहिती उघड होतेय. ‘त्या’ पाच नराधमांनी पीडित मुलीला धमकावण्यासाठी दारुची फोडलेली बाटली तिच्या गळ्याजवळ धरली होती. जागेवरून हलली तर गळा चिरू, अशी धमकी देऊन या नराधमांनी तिच्यावर बळजबरी केली.
मुंबईत झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेनं केवळ मुंबईकरांनाच नाही तर संपूर्ण देशाला हादरवून टाकलंय. डिसेंबर २०१२ मध्ये दिल्लीत झालेल्या बलात्कार प्रकरणाशी साधर्म्य साधणारीच ही या २२ वर्षीय महिला पत्रकाराची कहाणी... दिल्लीत २३ वर्षीय सायकोथेरेपिस्ट इंटर्नवर झालेल्या बलात्कारानंतर ‘ती’ बराच काळ जीवन-मरणाच्या रेषेवर झुंजत राहिली पण अखेर तिला हार पत्करावी लागली. पण, मुंबईत झालेल्या या घटनेतील पीडितेनं मात्र ठामपणे आपल्यावर झालेल्या अन्यायाविरोधात उभं राहण्याचं ठरवलंय.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडितेनं मुंबई पोलिसांना आपल्यावर झालेल्या अन्यायाची माहिती दिलीय. या नराधमांच्या ताब्यात सापडलेल्या या तरुणीला तिच्या त्यावेळी आईचेही दोन फोन आले होते. हे फोन या पाच नराधमांपैकीच एकानं रिसीव्ह केले आणि तिच्या आईला ती व्यवस्थित असल्याचं सांगितलं. सामूहिक बलात्कार केल्यानंतर या नराधमांनी तिच्या त्या अवस्थेतील फोटो क्लिक केली. ‘तोंड उघडलंस तर हेच फोटो जगजाहीर करू’ अशी धमकीही त्यांनी तिला दिली.
त्यांच्या धमक्यांना भीक न घालता या धाडसी तरुणीनं सरळ जसलोक हॉस्पीटल गाठलं. त्यामुळे डॉक्टरांना पुरावे गोळा करण्यासही मदत झाली.

दरम्यान, मुंबई पोलिसांनी आज आणखी एका आरोपीला अटक केलीय. रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. या आरोपीचं नाव विजय जाधव असं आहे. त्याला मदनपुरा भागातून क्राईम ब्रान्चनं ताब्यात घेतलंय. कालच, या घटनेतील पहिल्या आरोपीला, एका १९ वर्षीय बेरोजगार तरुणाला अटक केली होती. अद्यापही फरार असलेल्या तीन आरोपींची नावं कसिम बेंगाली, सलीम आणि अश्फाक अशी आहेत.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, August 24, 2013 - 16:09
comments powered by Disqus