`मुंबई-पुणे एक्सप्रेस वे`वर पुन्हा अपघात; पाच जण जागीच ठार

मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर झालेल्या कार अपघातात पाच जण जागीच ठार तर दोन जण जखमी झालेत. मुंबईहून पुण्याकडे भरधाव निघालेल्या स्विफ्ट कारनं डिव्हायडर तोडून दुसऱ्या बाजूनं येणाऱ्या ‘इको’ला धडक दिल्यानं हा अपघात घडलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 28, 2013, 12:57 PM IST

www.24taas.com, लोणावळा
मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर झालेल्या कार अपघातात पाच जण जागीच ठार तर दोन जण जखमी झालेत. मुंबईहून पुण्याकडे भरधाव निघालेल्या स्विफ्ट कारनं डिव्हायडर तोडून दुसऱ्या बाजूनं येणाऱ्या ‘इको’ला धडक दिल्यानं हा अपघात घडलाय.
या अपघातात दोन्ही गाड्यांचा चक्काचूर झालेला आहे. ‘इको’ कारमधल्या तिघांचा आणि ‘स्विफ्ट’मधल्या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघं गंभीर जखमी आहेत. लोणावळ्याच्या पवना पोलीस चौकीजवळ हा अपघात झालाय. अपघातातल्या जखमींना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलवण्यात आलंय.

गेल्या काही दिवसांत मुंबई एक्स्प्रेस हायवेवर अपघातांचं प्रमाण वाढलंय. आज सकाळी साडे आठ वाजता लोणावळ्याजवळ भरधाव ‘स्विफ्ट’ कार डिव्हायडर तोडून दुसऱ्या लेनमधील ‘इको’ कारवर आदळली. असाच अपघात गेल्या महिन्यात म्हणजे २४ डिसेंबरच्या मध्यरात्री झाला होता. मराठी सिनेसृष्टीतील दोन अभिनेते आनंद अभ्यंकर आणि अक्षय पेंडसे तसंच अक्षयचा अवघ्या दोन वर्षांचा मुलाचा या अपघातात नाहक बळी गेला होता. लेन आणि डिव्हायडर तोडून आलेला टेम्पो पेंडसेंच्या कारवर आदळल्यानं हा अपघात घडला होता.