मुंबई पुन्हा हादरली, ट्रकमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार

रे रोड रेल्वे स्थानकाजवळील रस्त्याकडेला पार्क असलेल्या ट्रकमध्ये नेऊन २१ वर्षीय तरुणीवर तिघा नराधमांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना सोमवारी उघडकीस आली. या प्रकरणी गस्तीवर असलेल्या काळाचौकी पोलिसांनी नराधमांच्या तावडीतून तरुणीची सुटका करत तिघाही आरोपींच्या मुसक्या आवळल्या. 

Updated: Feb 4, 2015, 11:06 AM IST
मुंबई पुन्हा हादरली, ट्रकमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार title=

मुंबई: रे रोड रेल्वे स्थानकाजवळील रस्त्याकडेला पार्क असलेल्या ट्रकमध्ये नेऊन २१ वर्षीय तरुणीवर तिघा नराधमांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना सोमवारी उघडकीस आली. या प्रकरणी गस्तीवर असलेल्या काळाचौकी पोलिसांनी नराधमांच्या तावडीतून तरुणीची सुटका करत तिघाही आरोपींच्या मुसक्या आवळल्या. 

सलीम शेख (२१), राहुल मंडल (२०) आणि पंचू गणेश डोकी (२५) अशी तिघा नराधमांची नावं असून तिघंही मस्जिद इथं एका ज्वेलर्सच्या दुकानात कारागीर आहेत.

अंधेरी इथं राहणारी २१ वर्षीय तक्रारदार तरुणी नेहमीप्रमाणे रे रोड दर्ग्यात दर्शनास आली होती. दर्शनास उशीर लागल्यानं रात्री दहाच्या सुमारास तिने रे रोड रेल्वे स्थानक गाठलं. मात्र घरी जाण्यास झालेला उशीर, त्यात ट्रेनही सुटल्यानं घाबरलेल्या अवस्थेत ती फलाटावर बसली. कामावरून घरी जात असलेल्या सलीम या नराधमाची नजर तिच्यावर पडली. आपणही त्याच दिशेनं जात असल्याचं सांगून तरुणीचा त्यानं विश्वास संपादन करत सलीम तिच्यासोबत ट्रेनमध्ये चढला. दरम्यान, सलीमचे इतर दोघं साथीदारही त्याच डब्यात चढले. त्यात तरुणीनं काही खाल्लं नसल्याचं लक्षात घेत सलीमनं तिला जेवणासाठी कॉटनग्रीन रेल्वे स्थानकावर उतरविलं आणि जेवणासाठी बाहेर नेत परिसरातील ट्रक पार्किंग विभागात नेलं. तिथं तरुणीला धमकावत रस्त्याकडेला पार्क केलेल्या एका ट्रकमध्ये नेऊन तिघांनीही तिच्यावर बलात्कार केला.

ट्रकमधून उतरताना स्थानिक ट्रक चालकाची नजर पडली. त्यानं तत्काळ याची माहिती काळाचौकी पोलिसांना दिली. गस्तीवर असलेल्या काळाचौकी पोलिसांनी तरुणीची नराधमांच्या तावडीतून सुटका केली. राहुल आणि पंचू यांना पोलिसांनी तत्काळ अटक केली. दरम्यान, सलीमनं पळ काढला. मात्र पोलिसांनी मंगळवारी सकाळी सलीमला रे रोड परिसरातून अटक केली. 

तक्रारदार तरुणी अजूनही झालेल्या प्रकारातून सावरली नसून जवळच्या रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. तिघंही आरोपींना कोर्टानं ९ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती काळाचौकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शेखर तावडे यांनी दिली. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.