‘कार्टुनिस्ट त्रिवेदी देशद्रोही नाहीत तर देशप्रेमी’

वादग्रस्त कार्टूनप्रकरणी अटकेत असलेल्या व्यंगचित्रकार असीम त्रिवेदींना २४ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Sep 11, 2012, 08:54 AM IST

www.24taas.com, मुंबई
वादग्रस्त कार्टूनप्रकरणी अटकेत असलेल्या व्यंगचित्रकार असीम त्रिवेदींना २४ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय. ‘त्रिवेदी हे देशद्रोही नसून देशप्रेमी असल्याचं’ इंडिया अगेन्स्ट करप्शननं म्हटलंय तर त्रिवेदींच्या अटकेशी सरकारचा संबंध नसल्याचा खुलासा गृहमंत्र्यांनी केलाय.
देशद्रोहाच्या आरोपाखाली अटकेत असलेले व्यंगचित्रकार असीम त्रिवेदी यांनी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. असीम यांना वांद्रे कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी त्यांनी जामीन घेण्यास नकार दिला. त्यामुळं त्यांना २४ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश कोर्टानं दिले.
असीम त्रिवेदींच्या अटकेचा निषेध करत इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या कार्यकर्त्यांनी वांद्रे पोलीस ठाण्याबाहेर निदर्शनं केली. त्रिवेदी हे देशद्रोही नसून देशप्रेमी असल्याची प्रतिक्रिया इंडिया अगेन्स्ट करप्शनचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी दिलीय. तर त्रिवेदींच्या अटकेशी गृहखातं किंवा सरकारचा संबंध नसल्याचंही गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी स्पष्ट केलंय.
या संदर्भात भारताचे निवृत्त न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनी असीम त्रिवेंदीची पाठराखण केलीय. ‘माझ्या मते असीमने कोणतंही बेकायदेशीर कृत्य केलेलं नाही. मुळात गुन्हा न केलेल्या कार्टूनिस्टला अटक करणं हाच आयपीसी अंतर्गत एक गुन्हा आहे… अशी अटक करणारे पोलीस आदेशांचं पालन करत होतो असं कारण देऊ शकत नाहीत’ असं मत काटजूं यांनी मांडलंय. त्रिवेदींच्या व्यंगचित्रामुळं पुन्हा एकदा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा चर्चेत आलाय. आता त्रिवेदींचं कृत्य हा राष्ट्रदोह ठरतो की नाही, हे कळण्यासाठी न्यायालयाच्या निकालाचीच वाट पाहावी लागणार आहे.