बीडीडी चाळीचा पुनर्विकास, भाजप- शिवसेनेत श्रेयवाद...

By Prashant Jadhav | Last Updated: Friday, April 21, 2017 - 19:27
बीडीडी चाळीचा पुनर्विकास, भाजप- शिवसेनेत श्रेयवाद...

कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : वरळी, डिलाईल रोड आणि नायगाव येथील 194 बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाचे भूमिपूजन उद्या शनिवारी होत आहे. 95 वर्षे जुन्या असलेल्या या चाळींच्या पुनर्विकासाचे भिजतं घोंगडं आता मार्गी लागल्यानंतर त्याच्या श्रेयावरून सत्ताधारी शिवसेना भाजपमध्ये झुंबड सुरु झालीय. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन होत असलेला हा सोहळा भाजपनं अक्षरश: हायजॅक केलाय.

बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्याची जय्यत तयारी वरळीच्या जांबोरी मैदानावर सुरु आहे. तर मैदानाबाहेर राजकीय पक्षांची जोरदार पोस्टरबाजी सुरु आहे. वरळीतल्या रस्त्यांवर सर्वत्र लावलेले पोस्टर, पक्षाचे झेंडे पाहिल्यास भूमिपूजन सोहळा केवळ भाजपचाच आहे की काय अशी शंका येते. मुख्य सोहळ्याठिकाणी भाजपमय वातावरण असले तरी बीडीडी चाळींच्या अंतर्गत भागात मात्र शिवसेनेने पोस्टरबाजी करत श्रेय मिळवण्याचा प्रयत्न केलाय.

भाजपच्या तुलनेत शिवसेनेची पोस्टरबाजी कमी दिसून येतेय. पण पत्रकांच्या माध्यमातून शिवसेना प्रत्येक बीडीडी चाळीतील रहिवाशांपर्यंत पोहचलीय. विधिमंडळात पुनर्विकास प्रकल्पाची नगरविकास राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी केलेली घोषणाही शिवसेनेच्या पथ्यावर पडलीय. एवढं असलं तरी कार्यक्रम पत्रिकेवर नजर टाकल्यास आणि सोहळा स्थळाबाहेरील वातावरण पाहिल्यास भाजपच कार्यक्रम हायजॅक करण्याचे संकेत मिळतायत. भाजपनं केलेल्या या पोस्टरबाजीचा शिवसेनेनं चांगलाच समाचार घेतलाय. 

पंधरा वर्षांच्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात हा प्रकल्प थोडाही मार्गी लागलेला नसताना केवळ मुख्यमंत्र्यांमुळे हा प्रकल्प अडीच वर्षात सुरु होत असल्याचं भाजप नेत्यांचं म्हणणं आहे. 

सेना भाजप सत्तेत एकत्र असली तरी श्रेयासाठी समोरासमोर दोन हात करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. बीडीडी चाळ पुनर्विकासासारखा मोठा प्रकल्प सुरु होताना श्रेयाची लढाई तर अपेक्षितच आहे.

First Published: Friday, April 21, 2017 - 19:27
comments powered by Disqus