एक्सक्लुझिव्ह : आंबेडकर भवन सांगा कुणाचे?

दादरमधील आंबेडकर भवन पाडल्यानं सध्या वादाला तोंड फुटलंय. त्याजागी बहुमजली आंबेडकर भवन उभारण्यात येणार आहे. नव्या भवनात आंबेडकर कुटुंबियांना दुप्पट जागा द्यावी, असा तोडगा रामदास आठवलेंनी सुचवलाय.

Updated: Jun 29, 2016, 05:08 PM IST
एक्सक्लुझिव्ह : आंबेडकर भवन सांगा कुणाचे? title=

मुंबई : दादरमधील आंबेडकर भवन पाडल्यानं सध्या वादाला तोंड फुटलंय. त्याजागी बहुमजली आंबेडकर भवन उभारण्यात येणार आहे. नव्या भवनात आंबेडकर कुटुंबियांना दुप्पट जागा द्यावी, असा तोडगा रामदास आठवलेंनी सुचवलाय.

आंबेडकरी अनुयायी, दलित चळवळीतल्या कार्यकर्त्ये या प्रकारामुळे संतापले. कारण त्यांचं श्रद्धास्थान असलेलं आंबेडकर भवन पाडण्यात आलं. दादर पूर्वेला चित्रा टॉकीजच्या मागच्या बाजूला असलेलं हे आंबेडकर भवन म्हणजे दलित चळवळीचं महत्त्वाचं केंद्र. मात्र द पीपल्स इम्प्रुवमेंट ट्रस्ट आणि आंबेडकर कुटुंबीय यांच्या कलहात ही ऐतिहासिक वास्तू वादग्रस्त बनली आहे. गेल्या शुक्रवारी मध्यरात्री आंबेडकर भवन आणि बुद्धभूषण प्रिटिंग प्रेसवर हातोडा चालवण्यात आला. त्यामुळं संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी हा मोर्चा काढला.

आंबेडकर चळवळीचं हे केंद्र उद्धवस्त करण्याचं रत्नाकर गायकवाड यांचं कारस्थान असून, पडद्यामागून कुणीतरी दुसराच सूत्रं हलवतोय, असा भडीमार प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. तर आंबेडकर भवनाची इमारत जुनी झाल्यानं ती पाडण्यात येतेय. त्याजागी तब्बल 60 कोटी रूपये खर्च करून नवीन 17 मजली इमारत बांधण्यात येणार आहे. ही नवी इमारत देखील आंबेडकरी चळवळीचंच केंद्र असणाराय, असा दावा ट्रस्टच्या वतीनं केला जातोय.

या वादामुळं अनेक प्रश्न नव्यानं ऐरणीवर आलेत. आंबेडकर भवनाची इमारत जुनी झाल्यानं ती पाडली जातेय का? त्याजागी खरंच आंबेडकरी चळवळीचं बहुमजली केंद्र उभारलं जाणाराय का? सरकार जाणीवपूर्वक आंबेडकरी चळवळीत हस्तक्षेप करतंय का? आणि आपल्या हातातलं सत्ताकेंद्र निसटत चालल्यानंच आंबेडकर कुटुंबीय रस्त्यावर उतरलेत? दलित चळवळीलाच आता याची उत्तरं शोधावी लागणार आहेत.