कागदपत्रांशिवाय बँक खाते काढणे सोपे

आपल्याला एकाद्या बॅंकेत नव्याने खाते उघडायचे असेल तर ओळख लागते. तसेच अनेक कागदपत्रे गोळा करावी लागतात. मात्र, यातून तुमची सुटका होऊ शकणार आहे. यासाठी तुम्हाला ‘आधार’कार्डचा उपयोग होणार आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Aug 20, 2013, 04:12 PM IST

www.24taas.com , झी मीडिया, मुंबई
आपल्याला एकाद्या बॅंकेत नव्याने खाते उघडायचे असेल तर ओळख लागते. तसेच अनेक कागदपत्रे गोळा करावी लागतात. मात्र, यातून तुमची सुटका होऊ शकणार आहे. यासाठी तुम्हाला ‘आधार’कार्डचा उपयोग होणार आहे.
बँकेत नवीन खाते उघडायचे असेल तर आपला यूआयडी नंबर दिला की खाते उघडू शकता. तेही काही मिनिटांमध्ये. ‘युनिक आयडेंटीफिकेशन नंबर अथॉरिटी ऑफ इंडिया’च्या (यूआयडीएआय) नवीन योजनेद्वारे बॅक खाते काढणे सोपे झाले आहे. यूआयडीएआयने नव्याने सुरू केलेल्या `ई-केवायसी` सुविधेअंतर्गत हे शक्य होणार आहे, याबाबत माहिती दिली ती यूआयडीएआयचे अध्यक्ष निलेकणी यांनी. ते मुंबईत एका चर्चासत्रात बोलत होते.
तुम्ही तुमचा यूआयडी नंबर दिला की बायोमेट्रिक्स सिस्टिमच्या आधारे बोटांचे ठसे घेतले जातील. त्यानंतर तुमची माहीती बॅंकेला मिळेल. या नव्या सिस्टीममुळे कोणत्याही कागदपत्रांची गरज भारणार नाही. हीच सुविधा अन्य सरकारी यंत्रणा तसेच टेलिकॉम क्षेत्रातही राबवण्याचा विचार असल्याचे निलेकणी यांनी सांगितले.
या सुविधेसाठी यूआयडीएआयशी टायअप असलेल्या बँका तसेच सरकारी कार्यालयांना ही सुविधा दिली जाणार आहे. या योजनेमुळे पेपरलेस कामकाज चालेल. तसेच अनेक बोगस कागदपत्रांच्या घोटाळ्यांना आळा बसेल तसेच वेळ आणि खर्चही वाचेल, असे ते म्हणाले.
लवकरच पासपोर्टवर यूआयडीनंबर येणार आहे. त्यामुळे यापुढे पासपोर्टसाठी आधार कार्ड ग्राह्य मानले जाईल. याबाबत पासपोर्ट प्राधिकरणाशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे पासपोर्टचा प्रश्नही निकाली निघेल, असे निलेकणी विश्वास व्यक्त केला. दरम्यान, आधार कार्डचा उपयोग करण्याचा अधिकार संबंधित संस्थांचा असेल. सक्तीनसून तो ऐच्छिक असेल, असेही स्पष्टीकरण त्यांनी केले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.