अबब! तर सलग सहा दिवस बँका बंद?

देशातील बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या दहाव्या द्विपक्षीय करारासाठी इंडियन बँक असोसिएशनसोबत (आयबीए) आज अंतिम बैठक होणार असून, यात वाटाघाटी निष्फळ झाल्यास येत्या २१ ते २४ जानेवारी अशा सलग चार दिवसीय संपाचा इशारा बँक कर्मचारी संघटनेनं दिला आहे. 

Updated: Jan 19, 2015, 01:17 PM IST
अबब! तर सलग सहा दिवस बँका बंद? title=

मुंबई : देशातील बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या दहाव्या द्विपक्षीय करारासाठी इंडियन बँक असोसिएशनसोबत (आयबीए) आज अंतिम बैठक होणार असून, यात वाटाघाटी निष्फळ झाल्यास येत्या २१ ते २४ जानेवारी अशा सलग चार दिवसीय संपाचा इशारा बँक कर्मचारी संघटनेनं दिला आहे. 

त्यानंतर २५ जानेवारी रोजी रविवार आणि २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन असल्यानं सलग सहा दिवस बँका बंद राहतील. परिणामी, याचा मोठा फटका ग्राहकांना बसणार आहे.

बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संघटनेचे निमंत्रक विश्वास उटगी यांनी एका वृत्तपत्राला सांगितलं की, गेल्या दोन वर्षांपासून वेतनवाढीसह अन्य मागण्यांसाठी आमचा संघर्ष सुरू आहे. वेळोवेळी आश्वासनं देऊनही त्या आश्वासनांची पूर्तता झालेली नाही. या संदर्भात अंतिम बैठक आज होणार आहे. सकाळी १० वाजता चार कर्मचारी संघटनाची तर दुपारी दोन वाजता अधिकाऱ्यांच्या संघटनेची चर्चा होणार आहे. यात जर तोडगा निघाला नाही तर यापूर्वीच आम्ही दिलेल्या इशाऱ्यानुसार संप केला जाईल.

गेल्या दोन वर्षांत संघटनेनं पाच वेळा संप पुकारला असून, हा आंदोलनाचा तिसरा टप्पा आहे. या संपामध्ये स्टेट बँक आणि स्टेट बँक समूहातील ५ सरकारी बँका, १८ राष्ट्रीयीकृत बँका, आयडीबीआय, कर्नाटक बँक, फेडरल बँक, १८ जुन्या खासगी बँका, स्टँडर्ट चार्टर्ड बँक, एचएसबीसी, सीटी बँक आणि ८ विदेशी बँकांमधील शाखा संपात सामील होणार असल्याचं संघटनेनं सांगितलं.

शिवाय नाबार्ड, रिझर्व्ह बँक आणि आयडीबीआय या बँकांचे कमर्चारी आणि अधिकारीही असे सुमारे १० लाख कर्मचारी संपात सहभागी होणार असल्यानं देशातील बँकिंग व्यवहार पूर्णपणे ठप्प होण्याची शक्यता आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.