विधानपरिषद निवडणूक : काँग्रेस-राष्ट्रवादीचं भांडण... भाजपचा लाभ!

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवाच कलगीतुरा रंगलाय. डिसेंबरमध्ये होऊ घातलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीनिमित्त आतापासूनच दोन्ही पक्षांमध्ये खटके उडतायत... या घडामोडींवर सत्ताधारी भाजप बारीक लक्ष ठेवून आहे.

Updated: Oct 5, 2016, 09:46 PM IST
विधानपरिषद निवडणूक : काँग्रेस-राष्ट्रवादीचं भांडण... भाजपचा लाभ! title=

दीपक भातुसे, मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवाच कलगीतुरा रंगलाय. डिसेंबरमध्ये होऊ घातलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीनिमित्त आतापासूनच दोन्ही पक्षांमध्ये खटके उडतायत... या घडामोडींवर सत्ताधारी भाजप बारीक लक्ष ठेवून आहे.

डिसेंबरमध्ये विधान परिषदेच्या 11 जागा रिक्त होत आहेत. सर्वच पक्षांमध्ये यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू असताना काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये जागावाटपावरून मतभेद असल्याचं स्पष्ट झालंय. 

रिक्त होणाऱ्या या ११ जागांपैंकी औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ, सांगली-सातारा, भंडारा-गोंदिया, यवतमाळ, पुणे या स्थानिक स्वराज्य संस्था या जागा जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत तर काँग्रेसकडे नाशिक पदवीधर आणि नांदेड स्थानिक स्वराज्य संस्थेची जागा आहे. जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था आणि अमरावती पदवीधर मतदारसंघात भाजपाचे आमदार आहेत तर नागपूर आणि कोकणचे शिक्षक मतदारसंघ अपक्षांच्या ताब्यात आहेत. 

सध्या असलेल्या पाचही जागा लढवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस उत्सुक आहे. तर काँग्रेसला तीन जागा जास्तीच्या हव्यात... स्वतःकडे असलेल्या मतदारसंघांच्या जोडीला यवतमाळ, भंडारा-गोंदिया, सांगली-सातारा इथंही काँग्रेसला उमेदवारी हवी आहे. तिथं काँग्रेसची ताकद वाढल्याचा पक्षाचा दावा आहे. 

राष्ट्रवादीसोबत जागा वाटपाची चर्चा सुरू असतानाच काँग्रेसनं अमरावती पदवीधर मतदारसंघातून संजय खोडके आणि नाशिकमधून डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीरही करून टाकलीय. यामुळे नाराज झालेल्या राष्ट्रवादीनंही तिथून उमेदवार उभे करण्याचा इशारा दिलाय.

दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ, ही इसापनीतीमधली गोष्ट भाजपा नेत्यांना चांगलीच ठावूक आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तुटली तर त्याचा थेट फायदा भाजपालाच होणार, हे निश्चित आहे. विधान परिषदेतलं तुटपंजं संख्याबळ लक्षात घेता भाजपासाठी ही निवडणूक कळीची ठरणार आहे.