'पद्मभूषण' मंगेश पाडगावकर यांचं निधन

ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांचं निधन झालंय. वयाच्या ८६ व्या वर्षी पाडगावकर यांनी या जगाचा निरोप घेतलाय.

Updated: Dec 30, 2015, 01:32 PM IST
'पद्मभूषण' मंगेश पाडगावकर यांचं निधन title=

मुंबई : ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांचं निधन झालंय.  वयाच्या ८६ व्या वर्षी पाडगावकर यांनी या जगाचा निरोप घेतलाय.

मराठीतला नवकवितांचा बादशाहा काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त केली जातेय. महाराष्ट्राला प्रेम शिकवणाऱ्या पाडगावकरांनी गेली अनेक वर्षे महाराष्ट्राच्या साहित्य रसिकांच्या मनावर अधिराज्य केलंय. २०१३ साली त्यांना 'पद्मभूषण' या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.  

पाडगावकरांचा अल्पपरिचय... 
मंगेश पाडगांवकर यांचा जन्म १० मार्च १९२९ रोजी महाराष्ट्रात वेंगुर्ला येथे झाला. पुढे त्यांनी मुंबई विद्यापीठातून मराठी व संस्कृत या विषयात पदव्युत्तर शिक्षण प्राप्त व काही काळ येथील रामनारायण रूईया महाविद्यालयात मराठीचं अध्यापनही केलं. 'कविता' या वाङ्मयप्रकारात त्यांनी लक्षणीय कार्य केलंय. त्यांचे १९५० पासून त्यांचे सुमारे ३० काव्यसंग्रह प्रकाशित झालेत. यापैंकी प्रत्येक  काव्यसंग्रहाच्या सुमारे पाच -पाच आवृत्या प्रकाशित झाल्या आहेत. 

वयाच्या १४ व्या वर्षापासून गेली सात दशकं मराठी कविता आणि साहित्य समृद्ध करणाऱ्या मंगेश पाडगावकर यांचा 'धारानृत्य' हा कवितासंग्रह १९५० प्रसिद्ध झाला होता. त्यानंतर प्रकाशित झालेले त्यांचे जिप्सी, निंबोणीच्या झाडामागे,छोरी, शर्मिष्ठा, उत्सव, वात्रटिका, मीरा, सलाम, गझल, भटके पक्षी,  तुझे गीत गाण्यासाठी, बोलगाणी, चांदोमामा, सुट्टी एके सुट्टी, सूरदास, उदासबोध, त्रिवेणी, कबीर, राधा, गिरकी हे काव्यसंग्रह विशेष लोकप्रिय ठरले. त्यांच्या कवितांमध्ये चिंतनशील कविता, बालकविता, प्रेमकविता, निसर्गकविता असे वैविध्यपूर्ण विषय हाताळलेले आढळतात. 

मराठी साहित्यविश्वात कविता हा गाऊन सादर करण्याचा प्रकार असताना पाडगांवकर-बापट-करंदीकर या त्रिकुटाने काव्य सादरीकरण हा नवा प्रकार मराठी विश्वात रूजू केला व जगभर त्याचे यशस्वी प्रयोगही केले. कवितेसह त्यांचे लेखसंग्रहही प्रकाशित झाला. त्यांच्या कर्तृत्वासाठी त्यांना १९८० साली 'साहित्य अकादमी' पुरस्काराने तसेच 'महाराष्ट्र भूषण' पुरस्काराने गौरविण्यात आलंय.   

त्यांनी मीराबाई आणि कबीराच्या दोह्यांचा तसेच शेक्सपिअरच्या नाटकांचा अनुवादही केला आहे. तसंच `बायबल`चा मराठी अनुवादही त्यांनी केला. आकाशवाणी रेडिओचे निर्माते म्हणूनही त्यांनी काही काळ काम केलं. महाराष्ट्रातल्या काव्य रसिकांना कविता कशी जगावी याचा अनुभव मंगेश पाडगावकर आणि विं. दा. करंदीकरांनी कवितांच्या जाहीर मैफिली सादर करून दिला.