मुंबै बँकेत ४०० कोटींचा कर्ज घोटाळा

मुंबै बँकेत सुमारे 400 कोटींचा कर्ज घोटाळा समोर आलाय. सर्वसामान्य लोकांनी कोणतेही कर्ज न घेताही त्यांच्या नावावर कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेण्यात आल्याचं दाखवण्यात आलंय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Aug 17, 2012, 05:46 PM IST

www.25taas.com, मुंबई
मुंबै बँकेत सुमारे 400 कोटींचा कर्ज घोटाळा समोर आलाय. सर्वसामान्य लोकांनी कोणतेही कर्ज न घेताही त्यांच्या नावावर कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेण्यात आल्याचं दाखवण्यात आलंय. तसंच कर्जवसुलीसाठी त्यांना बँकेनं नोटीसाही पाठवल्यात. राज्य सरकारनं उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिलेत. मात्र या घोटाळ्यांत बड्या लोकांची नावे सामील असल्यानं कारवाई मंदगतीनं सुरु आहे.
मुंबईत ऑटोरिक्षा चालवणा-या नाजिमला मुंबै बँकेकडून एक कोटींचे कर्ज भरण्यासाठी नोटीस मिळाल्यानं त्याला मोठा धक्का बसलाय. दिवसाला कटाकटी दोनशे रुपये मिळवणा-या नाजिमनं कर्ज घेतलंच नाही तर त्याची परतफेड का आणि कशासाठी करायची. अशीच स्थिती अकरावीत शिकणा-या सिद्धीची झालीय. बँकेंचं तोंडही न पाहणा-या सिद्धीलाही कर्ज परतफेड करण्यासंबंधीची नोटीस मिळालीय.

नाजिम आणि सिद्धीप्रमाणे मुंबईतल्या घाटकोपर, भांडूप आणि आसपासच्या परिसरातल्या अनेकांच्या नावे मुंबै बँकेतून 400 कोटींचे कर्ज घेण्यात आलंय. याप्रकरणी मुंबईतल्या 28 कोऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायट्या आरोपीच्या पिंज-यात असून त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आलाय. राज्य सरकारनेही या घोटाळ्याच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिलेत.

या घोटाळ्यासंबंधी मुंबई हायकोर्टातही याचिका दाखल करण्यात आलीय. ज्यामध्ये मुंबै बँकेचे संचालक आणि क्रेडिट सोसायटी यांच्या संगनमतातून हा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आलाय. सर्वसामान्यांच्या नावावर कोट्यवधींचे कर्ज घेणारे बडे मासे समोर आणण्यात पोलीस आणि सहकार विभागाला कितपत यश येतं ते पाहणं महत्वाचं ठरणाराय.