राज-भुजबळ भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते छगन भुजबळ यांच्या भेटीनंतर राजकीय पटलावर तर्कवितर्कांना उधाण आले आहे. या भेटीमागे कोणती राजकीय समीकरणे दडली आहेत हे जरी गुलदस्त्यात ठेवण्यात आले असले तरी विधानपरिषदेच्या निवडणुकीबाबतची भेट असावी अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगतेय.

Updated: Dec 6, 2015, 12:27 PM IST
राज-भुजबळ भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण title=

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते छगन भुजबळ यांच्या भेटीनंतर राजकीय पटलावर तर्कवितर्कांना उधाण आले आहे. या भेटीमागे कोणती राजकीय समीकरणे दडली आहेत हे जरी गुलदस्त्यात ठेवण्यात आले असले तरी विधानपरिषदेच्या निवडणुकीबाबतची भेट असावी अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगतेय.

या महिन्यांत आठ जणांची विधान परिषद सदस्यत्वाची मुदत संपतेय. मुंबईतून शिवसेनेचे रामदास कदम आणि काँग्रेसचे भाई कदम, नागपूरमधून काँग्रेसचे राजेंद्र मुळक, धुळेतून काँग्रेसचे अमरिश पटेल, नंदुरबारचे महादेव महाडिक(काँग्रेस), सोलापूरात राष्ट्रवादीचे दीपक साळुंखे, बुलढाणातील शिवसेनेचे गोपीकिसन बजोरिया, नगरमधील अरुण जगताप (राष्ट्रवादी) निवृत्त होतायत. त्यामुळे या जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. 

शिवसेनेकडे पुरेसे संख्याबळ असल्याने मुंबईतील दोन जागांपैकी एका जागेवर शिवसेनेचा उमेदवार जिंकून येऊ शकतो. शिवसेनेचे रामदास कदम यांना परत उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. मात्र दुसऱ्या जागेसाठी चांगलीच चुरस पाहायला मिळणार आहे.

मनसेकडे २९ मते असल्याने त्यांची ही मते या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहेत. ही मते ज्यांच्या पारड्यात पडतील त्यावर दुसऱ्या जागेवर कोण वर्चस्व मिळवणार हे ठरणार आहे. त्यामुळे ही मते आपल्या पारड्यात घेण्यासाठी सर्वांचीच जुळवाजुळव सुरु झालीय. यामुळे की काय भुजबळ राज यांच्या भेटीला गेले होते अशी अटकळ बांधली जातेय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.