'इडियट रणछोडदास'वर शिवसेनेचा हल्लाबोल!

असहिष्णुतेच्या मुद्द्यावर शिवसेनेनं अभिनेता आमिर खानवर हल्लाबोल केलाय. आमिरचा ‘इडियट रणछोडदास’ असा उल्लेख करत तो कुठल्या देशात राहायला जातोय हे स्पष्ट करावं, असा टोमणा 'सामना'मधून शिवसेनेनं मारलाय. 

Updated: Nov 25, 2015, 01:30 PM IST
'इडियट रणछोडदास'वर शिवसेनेचा हल्लाबोल! title=

मुंबई : असहिष्णुतेच्या मुद्द्यावर शिवसेनेनं अभिनेता आमिर खानवर हल्लाबोल केलाय. आमिरचा ‘इडियट रणछोडदास’ असा उल्लेख करत तो कुठल्या देशात राहायला जातोय हे स्पष्ट करावं, असा टोमणा 'सामना'मधून शिवसेनेनं मारलाय. 

'३ इडियटस' या सिनेमातील भूमिकेच्या पात्राच्या नावावरून आमिरला 'रणछोडदास' म्हणत आमिर 'बेईमानी'ची भाषा बोलत असल्याचं सामनाच्या संपादकीयमध्ये म्हटलं गेलंय. 

इतकंच नाही तर, 'खान जमाती'ला प्रश्न विचारत तुमच्यावर कोणतं संकट येऊन ठाकलंय? असाही प्रश्न विचारलाय. 

काय म्हटलंय नेमकं 'सामना'च्या संपादकीयमध्ये... 
हिंदुस्थान हा देश राहण्यालायक वाटत नसेल तर हे ‘इडियट रणछोडदास’ कोणत्या देशात जाणार आहेत? ज्यांना हा देश आपला वाटत नाही त्यांनी उगाच देशभक्तीच्या व ‘सत्यमेव जयते’च्या वल्गना करू नयेत.

आमीरला कोणत्या कारणांमुळे देशातून पळून जावेसे वाटले व या बाईलबुद्ध्याने ‘मातृभूमीस’ टांग मारून फिल्मी बायकोचे सांगणे इतके मनावर का घ्यावे हे त्याचे त्यालाच माहीत. आमीर खानच्या या वक्तव्याने त्याच्या ‘सत्यमेव जयते’चा मुखवटा साफ गळून पडला आहे व देशभक्तीचा फुगा फुटला आहे. देश संकटात असताना येथे ठामपणे उभे राहण्याचे सोडून सिनेमातील ही ‘खान’ जमात पळून जायची भाषा करते, पण मुळात या पळपुट्यांवर असे कोणते संकट कोसळले आहे ते तरी कळू द्या. 

आमीर खान व त्याच्या बायकोने एकदा कश्मीर खोर्‍यांतील आपल्या जवानांचे युद्ध जाऊन पाहावे. पाकड्यांशी लढताना जवान शहीद होतात म्हणून त्यांच्या निराधार कुटुंबीयांनी देशातून पळून जावे काय? की संकटांशी सामना करण्यापेक्षा रणावरून पळून जाण्याचा विचार सैनिकांनी करावा?

मुळात देश सोडून जाण्याची भाषा ही बेइमानीची आहे. या देशाने जे वैभव दिले ते सर्व इकडच्या इकडेच ठेवा. इथल्या पै आणि पैचा हिशेब ठेवा व मगच खुशाल देश सोडून जाण्याची भाषा करा. हिंदुस्थान हा देश राहण्यालायक वाटत नसेल तर हे ‘इडियट रणछोडदास’ कोणत्या देशात जाणार आहेत? पाकिस्तान, अफगाणिस्तान, पॅरिस, ब्रुसेल्स की माली हे लवकरात लवकर जाहीर करा. ज्यांना हा देश आपला वाटत नाही त्यांनी उगाच देशभक्तीच्या व ‘सत्यमेव जयते’च्या वल्गना करू नयेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.