चुनाभट्टीतल्या झोपडपट्टीत कोट्यावधींचा घोटाळा!

मुंबईच्या चुनाभट्टी इथल्या झोपडपट्टीतील रहिवाशांच्या नावे सरकारकडून घरे मिळवून अपात्र लोकांना भरमसाठ किंमतीत विकल्याचा आणि यामधून कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप होतोय. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी खेरवाडी पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी तक्रार दाखल केलीय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Aug 4, 2013, 06:24 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईच्या चुनाभट्टी इथल्या झोपडपट्टीतील रहिवाशांच्या नावे सरकारकडून घरे मिळवून अपात्र लोकांना भरमसाठ किंमतीत विकल्याचा आणि यामधून कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप होतोय. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी खेरवाडी पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी तक्रार दाखल केलीय.
सायन-चुनाभट्टी इथल्या आरसीएफजवळची महात्मा जोतिबा फुले झोपडपट्टी सध्या एका घोटाळ्यामुळं प्रकाशझोतात आलीय. सरकारच्या शिवशाही पुनर्वसन प्रकल्प लिमिटेडनुसार इथं राहणा-या 1182 कुटुंबांना तुर्भे-मंडाला इथं प्रत्येकी 2 लाखांत घरे दिलीयत. परंतु झोपडपट्टीतील सुमारे 350 कुटुंबे अजूनही इथं राहत असताना घरे दिली कोणाला. असा प्रश्न निर्माण झालाय. या झोपडपट्टीतील रहिवाशांना अंधारात ठेवून त्यांच्या नावावर इतरांनाच घरे देण्यात आली आणि यामध्ये शंभर कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होतोय. हा घोटाळा काँग्रेस आमदार भाई जगताप आणि त्यांच्या सहका-यांनी म्हाडाच्या अधिका-यांना हाताशी धरून केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलाय. तसंच याप्रकरणी त्यांनी खेरवाडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही दाखल केलीय.
काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी मात्र या घोटाळ्याचे आरोप फेटाळून लावले असून यासंदर्भातील चौकशीस तयार असल्याचं सांगितलंय. झोपडपट्टीत राहणारी कुटुंबे तिथंच राहत असताना त्यांच्या नावावर अपात्र लोकांना घरे मिळवून देताना अनेकजणांनी मलिदा लाटल्याचं सांगण्यात येतंय. त्यामुळं या घोटाळ्याची नि:पक्ष चौकशी करण्याची मागणी होतंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.