बँकेत ४१२ कोटींचा घोटाळा, मनसे आमदार अडचणीत?

‘मुंबै बँके’मध्ये सुमारे 412 कोटी रूपयांचा आर्थिक घोटाळा झाल्याचे अंतरिम तपासणी अहवालात उघडकीस आले आहे. मुंबै बँकेचे अध्यक्ष मनसेचे आमदार प्रवीण दरेकर आणि संचालक शिवाजी नलावडे यांच्यासह अन्य संचालकांवरही फौजदारी कारवाई करण्याची शिफारस अहवालात करण्यात आलीय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Oct 2, 2013, 08:40 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
‘मुंबै बँके’मध्ये सुमारे 412 कोटी रूपयांचा आर्थिक घोटाळा झाल्याचे अंतरिम तपासणी अहवालात उघडकीस आले आहे. मुंबै बँकेचे अध्यक्ष मनसेचे आमदार प्रवीण दरेकर आणि संचालक शिवाजी नलावडे यांच्यासह अन्य संचालकांवरही फौजदारी कारवाई करण्याची शिफारस अहवालात करण्यात आलीय. त्यामुळे एकच खळबळ उडालीय. आ. प्रवीण दरेकर यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावलेत.
मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेतील घोटाळ्यांची मालिकाच उघडकीस आलीय... बोगस कर्जवाटप, बेकायदा गुंतवणूक आणि ‘मुंबै बँके’चे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक शिवाजी नलावडे यांच्या मुलाने केलेले आर्थिक गैरव्यवहार याबाबतच्या चौकशीचे आदेश सहकार खात्याने दिले होते. मुंबई जिल्हा उपनिबंधक सुभाष पाटील यांनी याबाबतची चौकशी करून आपला अंतरिम तपासणी अहवाल सादर केलाय. त्यामध्ये सुमारे 412 कोटी 24 लाख रूपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा ठपका मुंबै बँकेच्या संचालक मंडळावर ठेवण्यात आलाय. याप्रकरणी बँकेचे संचालक मंडळ व संबंधित अधिकारी-कर्मचा-यांवर कारवाई करण्यात यावी, तसेच लोकसेवक या नात्याने सभासद व सर्वसामान्य ठेवीदार यांची फसवणूक, विश्वासघात केल्यामुळे फौजदारी गुन्हे नोंद करावेत, असे या अहवालात म्हटलंय.
मुंबै बँकेचे माजी अध्यक्ष शिवाजी नलावडे यांचा पुत्र राजा नलावडे यांना पात्रता नसताना बँकेत नोकरी व पदोन्नती देण्यात आली. नलावडे यांनी रोखे विक्री व्यवहारात बँकेचे 6 कोटी 60 लाख रूपयांचे, बेकायदा नोकर भरतीमुळे व त्यावर झालेल्या कोर्ट कज्जांमुळे 1 कोटी 63 लाख रूपयांचे, झोपडपट्ट्यांमध्ये संचालकांच्या जागा महागड्या दराने भाड्याने घेतल्याने 1 कोटी 78 लाख रूपयांचे, संचालक मंडळाने संगनमताने बोगस कर्जांचे वाटप केल्याने 129 कोटी रूपयांचे, मध्य प्रदेश औद्योगिक विकास महामंडळामध्ये बेकायदेशीर गुंतवणुकीमुळे 259 कोटी रूपयांचे, डिझास्टर रिकव्हरी साइट उभारणीमध्ये 6 कोटी रूपयांचे, विहित कार्यपद्धती न अवलंबता संगणक सॉफ्टवेअर, हार्डवेअर, राऊटर खरेदी केल्याने 7 कोटी रूपयांचे नुकसान झालेय. अशाप्रकारे जवळपास 412 कोटी रूपयांचे आर्थिक नुकसान संचालक मंडळाने केले, असे ताशेरे अहवालात ओढण्यात आलेत.
मुंबै बँकेच्या संचालक मंडळाने त्यांच्याकडे असलेल्या सत्तेचा स्वतःच्या स्वार्थासाठी गैरवापर केला. एवढेच नव्हे तर सहकार खात्याने सुरू केलेल्या चौकशीत कोणतेही सहकार्य केले नाही, असा ठपकाही चौकशी अहवालात ठेवण्यात आलाय. परंतु मुंबै बँकेचे अध्यक्ष व मनसे आमदार प्रवीण दरेकर यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावलेत....
अंतरिम तपासणी अहवालातले हे निष्कर्ष पाहता `तळे राखी, तो पाणी चाखी...` या म्हणीचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही... आता सरकार काय कारवाई करणार, याकडे लक्ष लागलेय...

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.