शिवसेनेचा भुजबळ यांच्यावर 'सामना'तून जोरदार हल्लाबोल

माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्यावर शिवसेनेनं जोरदार हल्लाबोल केलाय. एसीबीच्या कारवाईमुळं भुजबळांच्या सामाजिक क्रांतीची सच्चाई भूकंपाप्रमाणे बाहेर आल्याची टीका शिवसेनेचं मुखपत्र सामनाच्या अग्रेलखामधून करण्यात आली.

Updated: Jun 18, 2015, 11:55 AM IST
शिवसेनेचा भुजबळ यांच्यावर 'सामना'तून जोरदार हल्लाबोल  title=

मुंबई : माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्यावर शिवसेनेनं जोरदार हल्लाबोल केलाय. एसीबीच्या कारवाईमुळं भुजबळांच्या सामाजिक क्रांतीची सच्चाई भूकंपाप्रमाणे बाहेर आल्याची टीका शिवसेनेचं मुखपत्र सामनाच्या अग्रेलखामधून करण्यात आली.

भुजबळांनी समता परिषद आणि महात्मा फुलेंच्या नावानं स्वतःच्या कुटुंबीयांपुरतं समतेचं राज्य आणल्याचा घणाघात या अग्रलेखातून करण्यात आलाय.

सामनाच्या अग्रलेखात
। गेल्या पंचवीसेक वर्षात भुजबळ यांनी जी विविध पदे राजकारणात भूषविली त्या सगळ्या पदांचा गैरवापर करून अफाट विश्‍व त्यांनी उभारले. भुजबळांनी फुले यांचे नाव घेऊन ‘समता परिषद’ स्थापन केली. समतेचे राज्य त्यांना आणायचे होते. हे राज्य त्यांनी स्वत:च्या कुटुंबापुरते आणले, पण ते आता बुडाले आहे. भुजबळांची ‘सच्चाई’ भूकंपाप्रमाणे जमीन फाडून बाहेर आली आहे!  

। छगन भुजबळ यांच्यावरील धाडीत संपत्तीचे मोठे घबाड सापडले. यात आश्‍चर्य वाटावे, डोळे पांढरे व्हावेत असे काय आहे? पण महाराष्ट्राचा एक राजकारणी, एक माजी मंत्री सत्तेच्या काळात स्वत:चे आर्थिक साम्राज्य कसे उभे करतो, याचा उत्तम नमुना म्हणून भुजबळ व त्यांच्या कुटुंबीयांकडे बोट दाखवता येईल. कॉंग्रेसचे आणखी एक पुढारी कृपाशंकर सिंह यांनी मुंबईत कांदे-बटाटे विकून जीवनाची सुरुवात केली, पण त्याच कांदे-बटाटेवाल्याने राजकारणात शिरून अफाट व अचाट माया गोळा केली. त्याचा तपशील राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने कोर्टात सादर केला.

। ही संपत्ती मोजता येणे कठीण आहे. आता ‘भाजीविक्रेता’ म्हणून भायखळ्याच्या बाजारात जीवनाची सुरुवात करणार्‍या भुजबळांची संपत्ती समोर आली आहे. कांदे-बटाटे, भाजीपाला विकून इतके जबरदस्त श्रीमंत होता येत असेल तर महाराष्ट्रात कांदे-बटाटे, भाजी निर्माण करणारा शेतकरी अन्नान्नदशा होऊन का फिरत आहे? कांदे-टमाट्यास भाव नाही म्हणून तो रस्त्यावर आणून फेकला जात आहे, पण त्याच महाराष्ट्रात कृपाशंकर व भुजबळ या दोन कांदे-बटाटे, भाजीविक्रेत्यांनी 

। श्रीमंतीची वेगळीच झेप 
घेतली. दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या बांधकामात घोटाळ्याचे आरोप तेव्हा सार्वजनिक बांधकाममंत्री असलेल्या भुजबळांवर झाले. हे सर्व प्रकरण न्यायालयात गेले व न्यायालयाच्या आदेशाने भुजबळांसह संबंधित अनेकांवर गुन्हे दाखल झाले. खरे तर हे सर्व प्रकरण न्यायालयात नेण्याची गरज नव्हती. नवे सरकार अधिकारावर येताच त्यांनी अशा अनेक प्रकरणांच्या चौकशीचे आदेश तत्काळ द्यायला हवे होते, पण ते घडले नाही व न्यायालयास हस्तक्षेप करावा लागला. ‘एसीबी’ म्हणजे लाचलुचपतविरोधी खात्याने ज्या धाडी घातल्या त्यात भुजबळांची व त्यांच्या कुटुंबाची प्रचंड संपत्ती उघड झाली. मुंबई, नाशिक, पुण्यासह राज्यातील अनेक बंगले, जमिनी, फ्लॅटस्, संस्था, उद्योग असे अनेक ‘धंदे’ समोर आले व शेकडो कोटींची ही मायानगरी चमकू लागली.

। सामाजिक क्रांतीची हीच सच्चाई 
फुले-आंबेडकर-शाहूंचे व बहुजन समाजाचे नाव घ्यायचे व श्रीमंती थाट मिरवायचा. महात्मा फुल्यांनी गरीब शेतकर्‍यांचे दु:ख वेशीवर टांगले. त्यासाठी स्वत: झीज सोसली, पण आज फुल्यांच्या नावावर तीन फुल्यांचे राजकारण करून इमले उभारले जात आहेत. भुजबळ महाराष्ट्राचे गृहनिर्माणमंत्री होते, गृहमंत्री होते, सार्वजनिक बांधकाममंत्री होते. गृहमंत्री असताना तेलगी प्रकरणाचे शिंतोडे त्यांच्या अंगावर उडाले, पण राज्य त्यांचेच असल्याने ते सुटले. महाराष्ट्राच्या राजकारणातील श्रीमंती भुजबळांच्या निमित्ताने चव्हाट्यावर आली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.