मुंबई : मांस विक्री बंदीबाबत राजयकीय वातावरण अधिक तापू लागले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तंबी दिली असताना आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कडक शब्दात इशारा दिलाय. मांस विक्रीवर बंदी घालू देणार नाही, असे स्पष्ट केलेय.
पर्युषणाच्या काळात मांस विक्रीवर बंदी घालण्याची मागणी करण्यात येत आहे. तर भाजपची सत्ता असलेल्या मीरा-भाईंदर पालिकेत बंदी घातल्याने वातावरण तापले आहे. याबाबत महापौरांवर आता अविश्वास ठराव आणण्याच्या हालचाली सुरु झाल्यात. मांस विक्रीवर बंदी नको, अशीच सर्वांची मागणी दिसून येत आहे. या व्यवसायातील लोकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तर काँग्रेस, मनसे, समाजवादी पक्ष या पक्षांनी या बंदीस जोरदार विरोध दर्शविला आहे.
दरम्यान, मुंबई, मीरा-भाईंदरमध्ये मांसविक्रीवर बंदी घालू देणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी मुंबईमध्ये सांगितले. भाजपची सत्ता असलेल्या मीरा-भाईंदर महानगरपालिकेने पर्युषणाच्या काळात आठ दिवस, तर मुंबई महानगरपालिकेने चार दिवस मांसविक्रीवर बंदी घातली आहे.
तर नवी मुंबई महापालिकेनेही मांस विक्री करु नये असे आवाहन केले. मांस विक्री बंदीला शिवसेनेने पहिल्यापासूनच विरोध केलाय. राज्यातील सत्ताधारी भाजप आणि शिवसेना या निमित्ताने एकमेकांवर कुरघोडी करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे उद्धव ठाकरे यांनी मांसविक्रीवर बंदी घालू देणार नसल्याचे म्हटले आहे.
जैन धर्मीयांच्या पवित्र पर्युषण काळात मांसविक्रीवरील बंदीचे भाजपकडून समर्थन केले जात आहे. मीरा-भाईंदरमध्ये दीड लाखांच्या आसपास जैन लोकसंख्या असल्यानेच मांसविक्रीवरील बंदीचा निर्णय घेतल्याचा दावा महापौर गीता जैन यांनी केलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.