पिचकारीला बसणार आळा!

गुटख्यापाठोपाठ आता राज्यात खर्रा, मावा, जर्दा आणि तत्सम तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी घालण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. साधी सुपारी आणि तंबाखू सोडून इतर सर्व सुगंधित आणि इतर मिश्रण घातलेल्या तंबाखूजन्य पदार्थांच्या उत्पादन, विक्री आणि वितरणावर आता यामुळे बंदी असणार आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jul 22, 2013, 05:11 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
गुटख्यापाठोपाठ आता राज्यात खर्रा, मावा, जर्दा आणि तत्सम तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी घालण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. साधी सुपारी आणि तंबाखू सोडून इतर सर्व सुगंधित आणि इतर मिश्रण घातलेल्या तंबाखूजन्य पदार्थांच्या उत्पादन, विक्री आणि वितरणावर आता यामुळे बंदी असणार आहे. राज्यातील जनतेला आणि विशेषतः तरुणांना या पदर्थाच्या सेवनापासून दूर ठेवण्यासाठी राज्य सरकारने हे पाऊल उचलंले आहे. मुंबईत मावा तर विदर्भात खर्राची मोठ्या प्रमाणावर विक्री होत असून तरुणही या व्यसनाकडे ओढले जात असल्याचं दिसून आल्यानं राज्य सरकारने हा निर्णय घेतलाय.
वर्षभरापूर्वी राज्यात गुटखाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर राज्य सरकारनं आणखी एक पुढं पाऊल टाकलंय. सहज आणि कमी किंमतीत उपलब्ध होणाऱ्या गुटख्याच्या सेवनाची चटक शालेय विद्यार्थ्यांनाही लागली होती. मात्र गुटख्यावर बंदी घातल्यानंतर हाच तरुण वर्ग मावा, खर्रा आणि सेंटेड तंबाखू आणि सुपारीच्या व्यसनाकडे वळला होता. आता राज्य सरकारने या सर्व पदार्थांवरही बंदी घालण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय.
खर्रा (विदर्भात प्रसिद्ध) जर्दा, फ्लेव्हर्ड सुपारी, सेंटेड सुपारी आणि तंबाखू, ऍडीक्टीव्ह मिश्रीत तंबाखू आणि सुपारी या सर्वांचा समावेश असणार आहे. या सर्व पदार्थांच्या उत्पादन, विक्री आणि साठवणुकीवर बंदी असणार आहे.

वर्षभरापूर्वी गुटख्यावर सरकारने राज्यभर बंद घातली होती, मात्र तरीही राज्यभरात 22 कोटी रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला, त्यातील 12 कोटी रुपयांचा गुटखा नष्ट करण्यात आला आहे. बाहेरील राज्यातून हा माल छुप्या पद्धतीने राज्यात विक्रीसाठी येत असल्याने त्याला प्रतिबंध घालणे सरकारला अवघड जातंय. त्यामुळे देशभरच गुटखाबंदी व्हावी यासाठी राज्य सरकारने प्रयत्न चालवले आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.