प्रबोधनकार ठाकरे इतके महत्त्वाचे का होते...?

महाराष्ट्राला आत्मभान देणारे विचारवंत प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त डॉ. सदानंद मोरे यांचे व्याख्यान आयोजिक करण्यात आले आहे.

Updated: Sep 14, 2012, 05:03 PM IST

www.24taas.com, मुंबई
महाराष्ट्राला आत्मभान देणारे विचारवंत प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त डॉ. सदानंद मोरे यांचे व्याख्यान आयोजिक करण्यात आले आहे. प्रबोधनकारांचे विचार आणि कर्तृत्व यांचे डॉक्युमेंटेशन करणारी वेबसाईट प्रबोधनकार डॉट कॉम ने सोमवारी १७ सप्टेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजता दादर, कबुतरखाना येथील ब्राह्मण सेवा मंडळाच्या सभागृहात हा जयंती सोहळा आयोजित केला आहे. तसेच याप्रसंगी प्रबोधनकारांवर पहिला संदर्भग्रंथ लिहिणारे पुण्यातील पोस्टमन धर्मपाल कांबळे यांचाही सत्कार करण्यात येईल.
प्रबोधनकारांच्या लेखनाच्या निमित्ताने समज गैरसमजांचा धुरळा कसा उठतो ते नुकतंच काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी केलेल्या आरोपांमुळे दिसून आले. दिग्विजय सिंग यांनी माध्यमांना दिलेले प्रबोधनकारांच्या साहित्याचे संदर्भाशिवायचे पान समजून घेण्यापेक्षा संपूर्ण प्रबोधनकारच व्यक्तिमत्त्व समजून घेणं अधिक योग्य आहे. त्यासाठीच ‘आजही प्रबोधनकार महत्त्वाचे का?’ या विषयावरचे डॉ. सदानंद मोरे यांचे व्याख्यान महत्त्वाचे ठरते. विचारवंत आणि इतिहाससंशोधक म्हणून महाराष्ट्राला ज्ञात असणा-या मोरे यांचे प्रबोधनकारांविषयी एक नवे आकलन या व्याख्यानातून ऐकता येईल.
प्रबोधनकारांविषयी पहिला संदर्भग्रंथ ‘प्रबोधनकारः व्यक्तित्व, कार्य, साहित्य’ लिहिणारे धर्मपाल कांबळे यांचा याच सोहळ्यात सत्कार आयोजित करण्यात आला आहे. ते पुण्यात पोस्टमन म्हणून काम करतात. पण त्यांनी २००२ साली हा ग्रंथ लिहून प्रबोधनकारांच्या कर्तृत्वाच्या विविध अंगांचा परिचय करून दिला आहे. सध्या ते अण्णा भाऊ साठे समग्र साहित्याच्या प्रकल्पावर काम करत आहेत.
तसेच याप्रसंगी प्रबोधनकार डॉट कॉम या वेबसाईटच्या रिलॉन्चिंगचीही घोषणा करण्यात येईल. मूळ साईटमधील त्रुटी दूर करून नव्या रूपात ही साईट आता उपलब्ध असेल. मुंबई महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी या साईटचे निर्माते आहेत.
संपर्कः सचिन परब, संपादक, प्रबोधनकार डॉट कॉम (9987036805)