मुंबईकर महिलांसाठी स्पेशल बस

नोकरदार महिलांसाठी लवकरच मुंबई आणि उपनगरात लेडीज स्पेशल बसगाड्या सुरु होण्याची शक्यता आहे.

Updated: Sep 23, 2016, 09:10 PM IST
मुंबईकर महिलांसाठी स्पेशल बस  title=

मुंबई : नोकरदार महिलांसाठी लवकरच मुंबई आणि उपनगरात लेडीज स्पेशल बसगाड्या सुरु होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारच्या ‘तेजस्विनी’ योजनेअंतर्गत  50 बसगाड्या खरेदी करण्यासाठी बेस्टने प्रस्ताव सादर केला आहे. या योजनेअंतर्गत  50 टक्के निधी राज्य सरकार देणार असून या बसगाड्या खरेदीसाठी तरतूद करण्याची विनंती उपक्रमाने केली आहे.

ही विनंती मान्य झाल्यास महिलांची गर्दीच्या वेळी धक्काबुक्की सोसत प्रवास करण्याची कटकट संपणार आहे. राज्य सरकारने 2016-17 चा अर्थसंकल्प सादर करताना महिलांसाठी तेजस्विनी योजनेची घोषणा केली होती.

सार्वजनिक परिवहन सेवेतून सुरक्षित प्रवास करता यावा या उद्देशाने मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर आणि कल्याण-डोंबिवली या शहरांमध्ये केवळ महिलांसाठी 300 तेजस्विनी बसगाड्या सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यासाठी 50 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या गाड्यांच्या खर्चाचा 50 टक्के हिस्सा राज्य सरकार उचलणार असून उर्वरित भार संबंधित महापालिकेला उचलावा लागणार आहे.