मनसे कार्यकर्त्यांचा वखार अधिकारी कार्यालयात धुडगूस

यवतमाळ जिल्ह्यातील जोडमोहा येथे वखार अधिकारी कार्यालयात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी धुडगूस घालीत तोडफोड केली आहे.

Updated: Mar 9, 2013, 06:08 PM IST

www.24taas.com, यवतमाळ
यवतमाळ जिल्ह्यातील जोडमोहा येथे वखार अधिकारी कार्यालयात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी धुडगूस घालीत तोडफोड केली आहे. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेसाठी अधिकाऱ्यांनी अर्थसहाय्य देण्यास नकार दिल्यानं ही तोडफोड केल्याचा आरोप केला जातो आहे.
काल रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. वखार अधिकारी आणि वनपालांना प्रशांत नामक एका मनसे पदाधिकाऱ्यानं फोन वरून सभेसाठी वर्गणी मागितली होती. असे पैसे देता येणार नाहीत, असं या अधिका-यांनी सांगितल्याचा राग येऊन मनसेनं त्याना शिविगाळ आणि तोडफोड केल्याची तक्रार ग्रामीण पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
या प्रकरणी सात ते आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. `झी २४ तास`ने यवतमाळ मनसे जिल्हाध्यक्ष राजीव उंबरकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली. ही गोष्ट चुकीची आहे. त्यामुळे कोणत्या कार्यकर्त्याने जर कोणी असं केलं असेल तर त्याच्यावर नक्कीच कारवाई केली जाईल. त्याबाबत राज ठाकरेंकडे तसा संपूर्ण रिपोर्ट पाठविण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.