जीन्सचे रंग.. करती आयुष्य बेरंग

जीन्स पँट रंगविण्यासाठी लागणाऱ्या रंगांमुळं मालेगावात घातक रासायनिक प्रदूषण होत आहे. विशेष म्हणजे मालेगाव महापालिकेची वा प्रदूषण मंडळाची कुठलीही परवानगी न घेता रंगविण्याचं उद्योग सुरु आहे. अशा उद्योगांमुळे मालेगावकरांचचं नव्हे तर गिरणा नदीच्या काठावर वसलेल्या गावांतील ग्रामस्थांचं जीवन धोक्यात आलं आहे. आजची आवडती फॅशन म्हणजे जीन्स..

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Sep 9, 2012, 11:29 PM IST

www.24taas.com, मालेगाव
जीन्स पँट रंगविण्यासाठी लागणाऱ्या रंगांमुळं मालेगावात घातक रासायनिक प्रदूषण होत आहे. विशेष म्हणजे मालेगाव महापालिकेची वा प्रदूषण मंडळाची कुठलीही परवानगी न घेता रंगविण्याचं उद्योग सुरु आहे. अशा उद्योगांमुळे मालेगावकरांचचं नव्हे तर गिरणा नदीच्या काठावर वसलेल्या गावांतील ग्रामस्थांचं जीवन धोक्यात आलं आहे.
आजची आवडती फॅशन म्हणजे जीन्स.. या जीन्स पँटचा धागा रंगीविण्यासाठी इंडिगो नावाचा रंग वापरण्यात येतो. यात असलेलं रसायन अत्यंत घातक आहे. या रसायनांमुळे अकाली केस पांढरे होणे, त्वचा रोग, जन्मतः रोगदायी मुलांचा जन्म होतो.
मालेगावात सुरु असलेल्या या कारखान्यात मजुरांच्या आरोग्याकडं साफ दुर्लक्ष करण्यात येत असून त्यांना मास्क, ग्लोज तसंच आवश्यक बूट गणवेशही देण्यात आलेलं नाहीत. त्यामुळं यां कारखान्यात काम करणाऱ्या मजुरांना ब्रेन ट्युमर होण्याचा धोका आहे.यापूर्वी राजस्थानमधील रंगकाम करणा-या कारखान्यांमध्ये हे सिद्ध झालं आहे.
असे एक नव्हे तर तब्बल पंधरा कारखाने बिनधोकपणे मालेगावातील विविध भागांत सुरु आहेत .. इतकंच नव्हे तर कारखान्यातील दुषित पाणी गिरणा नदी सोडण्यात येतंय. यामुळं अनेक दुर्धर आजार होऊ शकतात. या सांडपाण्यापासून जमिनीही कायमच्या निकामी होतात. त्यामुळं धुळे जिल्ह्यातील गिरणेचे पाणी पिणाऱ्या अनेक गावांतील लोकांना मोठा धोका संभवतो.

देशात कुठेही नसेल इतक्या बिकट अवस्थेत मालेगावातील पावरलुम कामगार काम करत असतात. दरिद्री अवस्थेत काम करणा-या यां लोकांच आरोग्य या कारखान्यांमुळे पणाला लागत आहे. त्यामुळं गरज आहे तातडीने प्रदूषण रोखण्याची.