मनपाच्या रुग्णालयांतच डेंग्यूच्या डासांची `प्रसुती`!

नाशिकमध्ये डेंग्यूच्या रुग्णांची संख्या प्रचंड वाढतेय. परिस्थिती इतकी गंभीर असताना, नाशिक महापालिकेच्या रुग्णालयंच डासांची उत्पत्ती केंद्र ठरल्याचं समोर आलंय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Oct 31, 2013, 04:31 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
नाशिकमध्ये डेंग्यूच्या रुग्णांची संख्या प्रचंड वाढतेय. परिस्थिती इतकी गंभीर असताना, नाशिक महापालिकेच्या रुग्णालयंच डासांची उत्पत्ती केंद्र ठरल्याचं समोर आलंय.
नाशिकमध्ये डेंग्यूसह ताप आणि साथीच्या रुग्णांची संख्या वाढतेय. एकट्या ऑक्टोबर महिन्यात शहरात डेंग्यूचे तब्बल ५२ रुग्ण आढळलेत. तर तापाचे रुग्ण हजारोंच्या घरात आहेत. धक्कादायक बाब म्हणजे महापालिकेच्या रुग्णालयात दाखल झाल्यानंतर आजार कमी होण्यापेक्षा वाढण्याचीच शक्यता जास्त असल्याची नाशिककरांची तक्रार आहे.
महापलिकेच्या रुग्णालयांच्या कारभाराबद्दल वारंवार तक्रारी आल्यानंतर स्थायी समितीच्या सभापतींनी अचानक झाकीर हुसेन रुग्णालयाला भेट दिली. तिथली परिस्थिती धक्कादायक होती. बरेचसे अधिकारी आणि कर्मचारी अनुपस्थित होते. रुग्णालयातच प्रचंड अस्वच्छता होती. महिला आणि लहान मुलांच्या कक्षात डासांचं साम्राज्य होत. तर रुग्णालयाच्या गच्चीवर डबकं साचून त्यातूनच डासांची उत्पत्ती होत असल्याचं गंभीर वास्तव समोर आलं. या प्रकाराची गंभीर दाखल घेत अधिका-यांवर कारवाई करण्याचा इशारा सभापतींनी दिलाय.
महापालिका पदाधिका-यांनी अचानक पहाणी दौंरा केल्यानं रुग्णालय व्यवस्थापनानं फवारणी करणा-या कर्मचा-यांना बोलावलं आणि देखल्या देवाला दंडवत घालत दोन-पाच मिनिटांची नाटकी फवारणी केली. मात्र सभापतींची पाठ वळताच पुन्हा पहिले पाढे पंचावन्न....

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.