नाशिक पोलिसांचं मिशन... 'ऑल आऊट'

शहरातील गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी नाशिक पोलीस शुक्रवारी पुन्हा एकदा अचानक रस्त्यावर उतरले. या मिशनअंतर्गत ४२४ संशयितांवर कारवाई करण्यात आली. तर १९२९ वाहनांची तपासणी करण्यात आली. आगामी सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी व्यापाऱ्यांच्या भेटी घेऊन वर्गणी उकळणाऱ्यांवर तक्रारी करण्याचं आवाहन केलं.

Updated: Jul 29, 2012, 02:56 PM IST

www.24taas.com, नाशिक

शहरातील गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी नाशिक पोलीस शुक्रवारी पुन्हा एकदा अचानक रस्त्यावर उतरले. या मिशनअंतर्गत ४२४ संशयितांवर कारवाई करण्यात आली. तर १९२९ वाहनांची तपासणी करण्यात आली. आगामी सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी व्यापाऱ्यांच्या भेटी घेऊन वर्गणी उकळणाऱ्यांवर तक्रारी करण्याचं आवाहन केलं.

नाशिक पोलिसांनी पुन्हा एका महिन्याच्या अंतरानं ‘ऑल आऊट’ मिशन राबवलं. या मिशन अंतर्गत शहरातील सर्व पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी संध्याकाळी सहापासून रस्त्यावर उतरले होते. शिघ्रकृती दल, कमांडो पथक यासह एक हजार पोलीस संपूर्ण शहराचा काना-कोपरा पिंजून काढत होते. यासाठी पोलिसांनी पाच पथके तयार केली होती. पहिले पथक नाकाबंदी करत होते. दुसरे पथक झोपडपट्टी परिसरात संशयित गुन्हेगारांची धरपकड करत होते. तिसरे पथक नागरिकांच्या समस्या जाणून घेत होते. चौथं पथक बाजारपेठेत जाऊन व्यापाऱ्यांच्या भेटी घेत होते. पाचवे पथक विना परवाना वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई करत होते. पोलिसांच्या या ‘ऑल आऊट मिशन’चं नाशिककरांनी स्वागत केलंय. यावेळी नागरिकांनी चोरटे आणि गावगुंडांकडून होणाऱ्या त्रासाबद्दल पोलिसांकडं तक्रारी केल्या.

सण-उत्सवाच्या काळात व्यापारी वर्गाकडून बळजबळीनं वर्गणी उकळण्याचे प्रकार दरवर्षी घडतात. त्यामुळं व्यापाऱ्यांना धमकावून वर्गणी करणाऱ्यांवर पोलीस खंडणीचे गुन्हे दाखल करणार आहेत. यापूर्वी व्यापाऱ्यांना विश्वासात घेण्यासाठी पोलिसांनी मिशन राबवून  व्यापाऱ्यांच्या भेटी घेतल्या. शहरात गेल्या पाच महिन्यांपासून कोम्बिंग ऑपरेशन, ऑल आऊट मिशनसारखे अनोखे प्रयोग राबवण्यात येतायत. परंतू शहरातल्या घरफोडी आणि वाहन चोरीच्या घटना थांबलेल्या नाहीत. त्यामुळं गुन्हेगार हे पोलिसांच्या एक पाऊल पुढेच असल्याचं दिसतंय.

.