ओढ विठू माऊलीच्या भेटीची...

अवघ्या महाराष्ट्राचा धार्मिक सोहळा असलेल्या आषाढी वारीचा कार्यक्रम जाहीर झालाय. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं प्रस्थान ३० जूनला होणार आहे. तर जगतगुरू तुकाराम महाराज यांच्या पालखीचं प्रस्थान २९ जूनला होणार आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 18, 2013, 09:14 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पिंपरी - चिंचवड
अवघ्या महाराष्ट्राचा धार्मिक सोहळा असलेल्या आषाढी वारीचा कार्यक्रम जाहीर झालाय. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं प्रस्थान ३० जूनला होणार आहे. तर जगतगुरू तुकाराम महाराज यांच्या पालखीचं प्रस्थान २९ जूनला होणार आहे. पण यंदा पिंपरीमध्ये तुकाराम महाराज यांच्या पालखीचा एकच मुक्काम झाल्याने यंदा पिंपरी-चिंचवडमध्ये रिंगण सोहळा मात्र होणार नाही. गेली दोन वर्ष पिंपरी चिंचवड मधला मुक्काम वाढल्याने इथं गोल रिंगण होत होतं.
ग्यानबा-तुकारामच्या गजराने सगळ्यांना एकत्र बांधणारा पालखी सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. ज्ञानेश्वर महाराज देवस्थान समिती कडून पालखी सोहळ्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय. परंपरेनुसार ज्येष्ठ वद्य अष्टमीला म्हणजेच तीस जूनला ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे. पहिल्या दिवशी पालखीचा मुक्काम आळंदी मध्येच असणार आहे.

ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचं मुक्काम वेळापत्रक...
१ जुलै आणि २ जुलैला पालखी पुण्यात असणारेय. ३ आणि ४ तारखेला सासवडमध्ये मुक्काम असणारेय. ७ आणि ८ तारखेला लोणंद तर ९ तारखेला पालखीचा तरडगाव मध्ये मुक्काम करणार आहे. फलटणमध्ये पालखीचा मुक्काम १० आणि ११ तारखेला असणारेय. बरडला १२ तारखेला आणि नातेपुते इथे १३ तारखेला पालखी पोहोचणार आहे. त्यानंतर पालखीचा १४ तारखेचा मुक्काम माळशिरस तर १५ तारखेचा मुक्काम वेळापूर इथे असणारेय. १६ तारखेला पालखी भंडीशेगाव तर वाखरीमध्ये १७ तारखेला पालखीचा मुक्काम असणारेय. १८ तारखेला पालखी पंढरपूरला पोहचेल. १९ तारखेला आषाढीचा सोहळा रंगणार आहे.
पालखी सोहळ्यात परंपरेनुसार रिंगण सोहळे होणारेत. नीरा स्नान ७ तारखेला होणार आहे. पहिलं उभं रिंगण चांदोबाचं लिंब इथं ९ तारखेला होईल. पाहिलं गोल रिंगण १४ तारखेला सदाशिव नगर इथे होईल तर खुडूस फाट्याला दुसरं गोल रिंगण आणि १६ तारखेला ठाकूर बुवांच्या समाधीजवळ तिसरं गोल रिंगण होणार आहे. वाखरी जवळ दुसरं उभं रिंगण आणि चौथा गोल रिंगण सोहळा होणारेय. १८ तारखेला वीसबावी जवळ तिसऱ्या उभ्या रिंगणाचा सोहळा रंगणार आहे.

तुकाराम महाराज पालखी
दुसरीकडे आषाढी वारीसाठी संत श्री तुकाराम महाराजांची पालखी परंपरेप्रमाणे ज्येष्ठ कृष्ण सप्तमीला म्हणजेच २९ जूनला संत तुकाराम महाराजांची पालखी मुख्य देऊळवाड्यातून प्रस्थान ठेवणार आहे. पहिल्या दिवशी पालखीचा मुक्काम देहूतच इनामदारसाहेब वाडा येथे असेल. पालखी इनामदार वाड्यातून मार्गस्थ होऊन पिंपरी चिंचवड मध्ये आकुर्डीला ३० जूनला मुक्कामी येईल. पिंपरीमध्ये तुकाराम महाराज यांच्या पालखीचा एकच मुक्काम झाल्याने यंदा पिंपरी-चिंचवडमध्ये रिंगण सोहळा मात्र होणार नाही. गेली दोन वर्ष पिंपरी चिंचवड मधला मुक्काम वाढल्याने इथे गोल रिंगण होत होतं.
१ आणि २ जुलैला पालखीचा पुण्यात मुक्कामी असेल. ३ तारखेला पालखी लोणी काळभोरला तर ४ तारखेला यवतच्या श्री भैरवनाथ मंदिरात मुक्काम करणार आहे. ५ तारखेला वरवंड येथील श्री विठ्ठल मंदिरात तर शनिवारी ६ तारखेला उंडवडी गवळ्यांची इथे पालखीचा मुक्काम असेल. ७ तारखेला पालखीचा मुक्काम बारामतीतील सांस्कृतिक भवनात असेल. ८ तारखेला सणसरला मुक्काम असेल. ९ तारखेला पालखी सणसरहून बेलवडी, लासुर्णेमार्गे अंथुर्णे इथे मुक्कामी जाईल.
बेलवडीत पहिलं गोल रिंगण होईल. पालखी १० तारखेला निमगाव केतकीत, तर ११ आणि १२ तारखेला सोहळा इंदापूर मुक्कामी असेल. ११ जुलैला इंदापूर इथे दुसरं गोल रिंगण होईल. शनिवारी १३ तारखेला पालखीचा सराटीत, तर १४ तारखेला पालखी अकलूज मुक्कामी जाईल. माने विद्यालयाच्या पटांगणात तिसरं गोल रिंगण होईल. सोमवारी १५ तारखेला पालखीचं माळीनगर इथं पहिलं उभं रिंगण करून पालखी बोरगाव येथे मुक्कामी जाईल. १६ तारखेला सोहळा पिराची कुरोलीत, आणि नंतर १७ तारखेला वाखरीत मुक्काम करेल. तिथंच बाजीराव विहीर इथं दुसरं उभं रिंगण होईल. १८ तारखेला पालखी सोहळ्यात वाखरीजवळ अभंग आरती आणि तिसरं उभं रिंगण होणार आहे. त्यानंतर सोहळा पंढरपूरमध्ये पोहोचेल आहे. १९ तारखेला आषाढीचा सोहळा रंगणार आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.