आता काय बोगस कार्डांचाच ‘आधार’ उरलाय?

आधारकार्ड काढण्यासाठी तलाठी आणि सरपंच यांची खोटी सही आणि शिक्क्यांचा वापर करण्यात आल्याची धक्कादायक वस्तुस्थिती सांगली जिल्ह्यात उघडकीस आलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Aug 4, 2013, 01:37 PM IST

www.24taass.com, झी मीडिया, सांगली
आधारकार्ड काढण्यासाठी तलाठी आणि सरपंच यांची खोटी सही आणि शिक्क्यांचा वापर करण्यात आल्याची धक्कादायक वस्तुस्थिती सांगली जिल्ह्यात उघडकीस आलीय. पश्चिम बंगालमधल्या १७ कारागिरांना हे बनावट आधारकार्ड देण्यात आलंय. या संपूर्ण प्रकरणामागे संघटित टोळीचा हात असून या प्रकरणी तातडीनं कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांनी केलीय.
इथल्या नागरिकांना मिळालेली रेशनकार्ड निरखून पाहिलीत तर आटपाडीत सोन्या चांदीच्या दागिन्यांची कारागिरी करणाऱ्या १७ बंगाली भाषिकांनाही अधिकृत आधारकार्ड मिळाल्याचं दिसून येईल. यासाठी आटपाडीचे तलाठी आणि सरपंचांच्या दाखल्याचा आधार देण्यात आलाय. मात्र, या दोन्ही सह्या बनावट आहेत. या दाखल्यावरचे शिक्के कुठन आले याचं गुढंही कायम आहे. मुळात दोनच दाखल्यांच्या आधारावर या परप्रांतीयांना आधारकार्ड काढण्याची कोणती सवलत देण्यात आली? असा प्रश्न विचारला जातोय.

याप्रकरणी ‘आपली सही खोटी असल्याचा’ दावा सरपंच स्वाती सागर यांनी केलाय. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश तहसीलदार जोगेंद्रसिंग कट्यारी यांनी दिलेत.
बनावट रेशनकार्ड किंवा आधार कार्ड सहजगत्या मिळण्याचे प्रकार यापूर्वीही अनेकदा घडलेत. सांगलीमध्ये याचा आणखी एक प्रकार समोर आलाय. कार्डचा हा काळबाजार रोखण्याबाबत सरकार कधी गंभीर होणार हा प्रश्न कायम आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.