वंशाच्या दिव्यासाठी... आईच्या मदतीनं पत्नी-मुलींची हत्या!

By Shubhangi Palve | Last Updated: Saturday, November 9, 2013 - 11:17

www.24taas.com, झी मीडिया, अहमदनगर
अहमदनगर जिल्ह्यातल्या डोंगरगण इथली ही धक्कादायक घटना... नात्यांवरचा विश्वासच फोल ठरवणारी... आपल्या आईच्या मदतीनं पत्नी व दोन चिमुरडींची हत्या करणाऱ्या इसमाला पोलिसांनी अटक केलीय. वंशाला दिवा हवा या अट्टहासापोटी ही घटना घडल्याचं नातेवाईकांचं म्हणणं आहे.
डोंगरगण इथं राहणारा गणेश भूतकर याने आपली आई लक्ष्मीबाई भूतकर हिच्या मदतीने स्वतःच्या दोन मुलींसह पत्नीचा खून केलाय. या घटनेमुळे डोंगरगण येथे एकाच खळबळ उडाली आहे. गणेशने आपल्या राहत्या घरी ज्ञानेश्वरी या सहा वर्षाच्या आणि संजवनी या तीन वर्षांच्या मुलीचा गळा दाबून खून केलाय. एवढ्यावरच न थांबता गणेशने स्वतःची पत्नी अनिता हिचादेखील गळा दाबून जीवे मारले. या नराधाम बापाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यानेच पोलिसांना घटनेची माहिती फोनवरून दिली.
गणेश आणि अनिता यांचा विवाह २००५ झाला. मात्र, अनिता हिला गणेश वारंवार पैशाची मागणी करत होता आणि शारीरिक-मानसिक छळ करत होता. त्यातच अनिताला मुलगा न होता दोन्ही मुलीच झाल्या या कारणामुळे गणेश याने ही हत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय.

दरम्यान गणेश भूतकर आणि लक्ष्मीबाई भूतकर यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांनाही पोलिसांनी जेरबंद केले.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, November 9, 2013 - 11:17
comments powered by Disqus