पुण्यात नव्या अमली पदार्थाची नशा!

दारू, भांग, चरस-गांजा हे नशेचे पदार्थ सगळ्यांना माहीत आहेत. पुण्यात मात्र या सगळ्याहून वेगळा पदार्थ नशेसाठी वापरला जातोय. `मॅजिक मश्रूम` असं या पदार्थाचं नाव आहे...

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Sep 3, 2013, 08:07 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
दारू, भांग, चरस-गांजा हे नशेचे पदार्थ सगळ्यांना माहीत आहेत. पुण्यात मात्र या सगळ्याहून वेगळा पदार्थ नशेसाठी वापरला जातोय. `मॅजिक मश्रूम` असं या पदार्थाचं नाव आहे... धक्कादायक बाब म्हणजे मश्रूमची ही नशा कॉलेज तरुणांमध्ये लोकप्रिय आहे...
पुणे पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकानं एका आरोपीला अटक केलीय... राकेश किडो असं या आरोपीचं नाव आहे. केरळचा असलेला राकेश किडो पुण्यात अमली पदार्थ विकताना सापडला. धक्कादायक बाब म्हणजे त्याच्याकडे चरस, गांजा, कोकेन किंवा ड्रग्ज सापडले नाहीत. तर, त्याच्याकडे `माजिक मश्रूम` हा नशेचा नवा पदार्थ सापडलाय. नशेचं हे मश्रूम राकेश कॉलेजमधल्या तरुणांना विकायचा.
चरस, कोकेनपेक्षा नशेचं हे मॅजिक मश्रूम स्वस्त आहेत. त्याचबरोबर त्याचा वापरही सोपा आहे. आणखी महत्वाचं म्हणजे, नशेचं हे मश्रूम अजून पोलिसांच्या रडारवर नाही. राकेश किडो नाईट क्लब, पब आणि डिस्को मध्येही हे मश्रूम विकायचा.
नशेच्या या मॅजिक मश्रूमची तामिळनाडूतल्या कोडाईकनालमध्ये बेकायदेशीरपणे शेती केली जाते. तिथून ते प्लॅस्टिकच्या डब्यातून आणले जातात. नशा येण्यासाठी माजिक मश्रूम ओलेच खावे लागतात. माजिक मश्रूमचा एक गोळा साधारण ४०० रुपयांना मिळतो. मॅजिक मश्रूमच्या खरेदी-विक्रीत अनेक परदेशी तरुणही सहभागी आहेत. कॉलेज तरुणांमध्ये मॅजिक मश्रूमची ही वाढती झिंग धोक्याची घंटा आहे. हे ओळखूनच अमली पदार्थ विरोधी पथकानं पुण्यातल्या पाच कॉलेजेसवर विशेष लक्ष केंद्रित केलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.