१३ फ्लॅटसचा कर चुकवणारे शेलार अडचणीत!

पुणे मनपाचे उपायुक्त रमेश शेलार यांना मिळकत कर चुकवल्याप्रकरणी तीन दिवसांत खुलासा करण्याचे आदेश देण्यात आलेत.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jun 5, 2013, 10:45 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
पुणे मनपाचे उपायुक्त रमेश शेलार यांना मिळकत कर चुकवल्याप्रकरणी तीन दिवसांत खुलासा करण्याचे आदेश देण्यात आलेत. मनपा आयुक्त महेश पाठक यांनी हे आदेश दिलेत. दरम्यान, शेलार यांच्याकडील अतिक्रमण विभाग आणि आकाशचिन्ह परवाना विभागाचा पदभार काढून घेण्यात आलाय.
वारजे माळवाडी येथील शेलारांनी स्वताच्या इमारतीचा व्यावसायिक पद्धतीनं वापर केला. मात्र त्याचा मिळकत चुकवला, अशी माहितीच्या अधिकारात बाब समोर आलीय. शेलारांच्या पत्नीच्या नावे १३ फ्लॅट आहेत. ‘झी २४ तास’नं या प्रकरणी सतत पाठपुरावा केल्यानं अखेर शेलारांना तीन दिवसात खुलासा करण्याचे आदेश देण्यात आलेत.
‘शेलारनं दिली जीवे मारण्याची धमकी’
दरम्यान, शेलार यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार करण्यात आलीय. आरटीआय कार्यकर्ते विनायक फडके यांनी ही तक्रार केलीय. त्यामुळे शेलार यांच्या अडचणीत आणखीनच भर पडलीय. ती वारजे पोलीस ठाण्यात फडकेंनी त्यांना आलेल्या धमकी विषयी तक्रार दिली आहे. शेलार यांची कोट्यावधींची माया आणि थकवलेल्या टॅक्सचं प्रकरण फडके यांनी उघड केलं होतं. त्यामुळे शेलार यांनी धमकी दिल्याचा आरोप फडके यांनी केलाय.

शेलारांविरुद्ध युवा मोर्चाचं आंदोलन
पुणे महापालिकेतले वादग्रस्त उपायुक्त रमेश शेलारांच्या अडचणी वाढताना दिसताहेत. भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चानं शेलारांच्या विरोधात आंदोलन केलं. त्यांच्या कार्यालयाबाहेरच शेलारांच्या निषेधार्थ घोषणा देत हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी भाजपच्या युवा कार्यकर्त्यांनी शेलारांच्या कार्यालयाच्या दरवाज्याला खिळे ठोकून तो बंद केला. शेलार यांच्या चौकशी बरोबरच त्यांच्या निलंबनाची मागणी ही यावेळी करण्यात आली. तर पतित पावन संघटनेनं ही महापालिकेबाहेर आंदोलन करत चौकशी होईपर्यंत शेलारांना निलंबित करण्याची मागणी केली. शेलार यांनी आपल्या पत्नीच्या नावे १३ फ्लॅटस खरेदी करून त्याचा वर्षोनवर्षं लाखोंचा टॅक्स न भऱल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.