मराठा आरक्षणाला राज ठाकरेंचा विरोध

मराठा आरक्षणाला राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा विरोध केला आहे. जातीमध्ये विभागणी करून राज्यकर्ते मराठी माणसाची माथी भडकवत असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Apr 7, 2013, 09:51 PM IST

www.24taas.com, जळगाव
मराठा आरक्षणाला राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा विरोध केला आहे. जातीमध्ये विभागणी करून राज्यकर्ते मराठी माणसाची माथी भडकवत असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला. महाराष्ट्रातल्या मराठी माणसांचीच नव्हे, तर महापुरूषांचीही या लोकांनी विभागणी केल्याचं राज ठाकरेंनी दाखवून दिलं.
निवडणुकीमध्ये मत मिळवण्यासाठी राज्यकर्त्यांकडे असणारं हत्यार म्हणजे आरक्षण असल्याचं राज ठाकरेंनी जळगावात म्हटलं. मतांसाठी जाती जातींमध्ये तेढ निर्माण करून मराठी माणसाला एकमेकांची माथी फोडायला लावतात. महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेने मराठी म्हणून एकत्र येऊ नये, यासाठीच आरक्षणाच्या रूपाने जातीयवाद केला जात असल्याचं राज ठाकरे म्हणाले. मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय नेते एकत्र आले, पण महाराष्ट्रातल्या इतर प्रश्नांसाठी सर्वपक्षीय नेते असे एकत्र का येत नाहीत, असा सवाल, राज ठाकरेंनी केला. दुष्काळ, महिला सुरक्षा यांसारख्या महाराष्ट्रातील प्रश्नांवर एकत्र न येणारे सर्वपक्षीय नेते आरक्षणाच्या मुद्यावर एकत्र येऊन समाजाची जातींमध्ये विभागणी करत असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं.

केवळ मराठी माणसाचीच नव्हे, तर महापुरषांचीही यांनी जातीत विभागणी केल्याचं राज ठाकरेंनी दाखवून दिलं. छत्रपती शिवाजी महाराज मराठा समाजाचे, महात्मा फुले माळी समाजाचे, डॉ. आंबेडकर दलित समाजाचे, लोकमान्य टिळक ब्राह्मण समाजाचे अशी महापुरुषांचीही विभागणी केली गेल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं. संपूर्ण महाराष्ट्राचा प्रश्न एक असता फरक का करता, असा सवाल राज ठाकरेंनी केला.