करवीर नगरीत उद्यापासून 'महाराष्ट्र श्री'चा धमाका

महाराष्ट्राची क्रीडा नगरी असलेल्या करवीर नगरीत तब्बल दोन दशकानंतर महाराष्ट्र श्री राज्य अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेचा भव्य दिव्य क्रीडा सोहळा रंगणार आहे.  ४ आणि ५ मार्चला गांधी मैदानात होणारा शरीरसौष्ठवाचा मेळावा भरणार आहे. राज्यभरातून तब्बल १८० पेक्षा अधिक खेळाडू यात सहभागी होतील. 

Updated: Mar 3, 2016, 04:49 PM IST
करवीर नगरीत उद्यापासून 'महाराष्ट्र श्री'चा धमाका title=

कोल्हापूर : महाराष्ट्राची क्रीडा नगरी असलेल्या करवीर नगरीत तब्बल दोन दशकानंतर महाराष्ट्र श्री राज्य अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेचा भव्य दिव्य क्रीडा सोहळा रंगणार आहे.  ४ आणि ५ मार्चला गांधी मैदानात होणारा शरीरसौष्ठवाचा मेळावा भरणार आहे. राज्यभरातून तब्बल १८० पेक्षा अधिक खेळाडू यात सहभागी होतील. 

गेल्या महिनाभरापासून कोल्हापूरात महाराष्ट्र श्रीचा बोलबाला सुरू असून स्पर्धेची जय्यत तयारी सुरू आहे. महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटना आणि न्यू कोल्हापूर जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेच्या मान्यतेने होणाऱया स्पर्धेत खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहाता बक्षीसाच्या रकमेतही वाढ केली जाणार आहे. महाराष्ट्र श्रीचा मानकरी ठरणाऱ्याला दीड लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येईल. तर उपविजेत्याला ५० हजारांचे बक्षीस मिळेल. 

एकंदर आठ गटात होणाऱ्या स्पर्धेसाठी प्रत्येक गटात पाच लाखांची बक्षीसे दिले जातील. गेल्या वर्षभरात शरीरसौष्ठव खेळात झालेल्या रोख पुरस्कारांच्या वर्षावामुळे या खेळाकडे तरूणांचा कल वाढत आहे. अपेक्षेप्रमाणे तब्बल १८० खेळाडूंनी महाराष्ट्र श्री स्पर्धेसाठी आपली नावे पाठवली आहेत.  

नेहमीप्रमाणे मुंबई आणि मुंबई उपनगरचेच सर्वाधिक खेळाडू या स्पर्धेत सहभागी होत आहेत. मुंबईच्या खेळाडूंपुढे आव्हान देण्यासाठी पुणे, नवी मुंबई, सांगली, सातारा आणि कोल्हापूरातील तगडे खेळाडू उतरणार आहेत. यंदाही मानाच्या महाराष्ट्र श्री साठी सुनीत जाधव , जगदीश लाड, सागर कातुर्डे, महेंद्र चव्हाण यांच्यात काँटे की टक्कर होण्याची शक्यता आहे. गेल्या काही स्पर्धांमध्ये गत विजेत्या सुनीत जाधव सातत्याने यश मिळवित असल्यामुळे त्याला जेतेपद राखण्यासाठी फार संघर्ष करावा लागणार आहे. 

गतवर्षी हुकलेले जेतेपद पटकावण्यासाठी गेला महिनाभर प्रचंड घाम गाळणाऱया जगदीश लाडकडून धक्कादायक निकालाची अपेक्षा वर्तवली जात आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव उंचावणारे आशिष साखरकर, मंदार चवरकर, नितीन म्हात्रे, स्वप्निल नरवडकर यांच्यात चांगली चुरस रंगण्याची शक्यता आहे. 

मुख्य स्पर्धेबरोबर पुरूषांचा फिजिक स्पोर्टस् प्रकारही खेळविला जाणार आहे. या प्रकारात राज्यभरातून किमान २५ सर्वोत्तम खेळाडू आपले कौशल्य पणाला लावतील. या गटात जुनेद कालीवाला, निलेश बोंबले, मनोहर पाटीलसारखी दिग्गजही नावे आहेत. तसेच महिलांच्या प्रकारातही ८ जणींचा सहभाग निश्चित झाला असल्याची माहिती महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटनेचे सरचिटणीस अॅड. विक्रम रोठे यांनी दिली. मात्र हा गट सध्या नवीन असल्यामुळे या स्पर्धेतही मुंबईच्या श्वेता राठोड समोर कुणाचेही आव्हान टिकणे अशक्य आहे. 

दोन दशकानंतर राज्याच्या क्रीडा नगरीला महाराष्ट्र श्री आयोजनाची संधी लाभल्यामुळे न्यू कोल्हापूर संघटनेच्या राजेश वडाम आणि त्यांचे कार्यकर्ते स्पर्धा संस्मरणीय करण्याचा प्रयत्न असेल. १९९६ राम सरनाईक यांनी खासबागेत महाराष्ट्र श्री स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत पी. शिवकुमारने बाजी मारली होती. आताही तशीच भव्य स्पर्धा आयोजित केले जाणार असून स्पर्धेची प्राथमिक फेरी 4 मार्चला विक्रम नगरातील रामकृष्ण हॉलमध्ये होणार असल्याची माहिती वडाम यांनी दिली.