विम्बल्डनचा दुहेरी चाँद : मार्टिना हिंगीसच्या साथीने लिअँडर, सानिया विजेते

भारतीयांसाठी यंदाची विम्बल्डन स्पर्धा सर्वाधिक यशाची ठरली. महिला दुहेरीत सानिया मिर्झा, मुलांच्या दुहेरीत सुमीत नागल आणि मिश्र दुहेरीत लिअँडर पेस यांनी आपापल्या साथीदारांसह विजेतेपद मिळविले. 

AFP | Updated: Jul 13, 2015, 09:31 AM IST
विम्बल्डनचा दुहेरी चाँद : मार्टिना हिंगीसच्या साथीने लिअँडर, सानिया विजेते title=

विंबल्डन : भारतीयांसाठी यंदाची विम्बल्डन स्पर्धा सर्वाधिक यशाची ठरली. महिला दुहेरीत सानिया मिर्झा, मुलांच्या दुहेरीत सुमीत नागल आणि मिश्र दुहेरीत लिअँडर पेस यांनी आपापल्या साथीदारांसह विजेतेपद मिळविले. 

रविवारी झालेल्या अंतिम लढतीत पेसने स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगीसच्या साथीत अॅलेक्‍झांडर पेया (ऑस्ट्रिया) आणि टिमेआ बाबोस (हंगेरी) ६-१, ६-१ असा चाळीस मिनिटांत सरळ फडशा पाडला. पेसचे हे सोळावे ग्रॅंड स्लॅम विजेतेपद ठरले. 

हिंगीसला या स्पर्धेत दुसरे विजेतेपद मिळाले. तिने शनिवारी भारताच्याच सानिया मिर्झाच्या साथीत महिला दुहेरीचे विजेतेपद मिळविले होते. पेस आणि हिंगीस जोडीचे हे मोसमातील दुसरे ग्रॅंड स्लॅम विजेतेपद ठरले. त्यांनी या वर्षी ऑस्ट्रेलिया स्पर्धेतही विजेतेपद मिळविले आहे. 

आज झालेल्या अंतिम लढतीत हिंगीस आणि पेस यांनी अचूकता, आक्रमकता कमालीची पाहायला मिळाली. त्यांनी सहज प्रतिस्पर्ध्यावर सहज मात केली.

भारताची आघाडीची टेनिसपटू सानिया मिर्झाने टेनिस विश्‍व आणि विम्बल्डनच्या इतिहासात नाव सुवर्ण अक्षरांनी कोरले. सानियाने आपली स्वित्झर्लंडची सहकारी मार्टिना हिंगीसच्या साथीत विम्बल्डनच्या महिला दुहेरीचे विजेतेपद मिळविले. 

सानियाचे महिला दुहेरीतील पहिले ग्रॅंड स्लॅम विजेतेपद ठरले. सानिया-मार्टिना यांनी आपली सर्व्हिस राखत रशियाच्या एकेटेरिना माकारोवा आणि एलेना व्हेस्निना जोडीचा ५-७, ७-६ (७-४), ७-५ असा पराभव केला. ऑल इंग्लंड क्‍लबच्या टेनिस कोर्टवर सावली येऊ लागल्याने अखेरच्या सेटमध्ये ५-५ असा बरोबरीत सामना काही वेळ थांबविण्यात आला होता.

मार्टिनाशी जोडी जमल्यापासून त्यांचे यंदाच्या मोसमातील तिसरे विजेतेपद ठरले. या मोसमात त्यांना इंडियन वेल्स आणि मियामी ओपन स्पर्धा जिंकल्या आहेत. विंबल्डन जिंकून त्यांनी आपले महिला दुहेरीतील वर्चस्व सिद्ध केले आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.