मायक्रोसॉफ्टमधून गेट्‌स होणार पायउतार?

मायक्रोसॉफ्टमध्ये गुंतवणूक करणाऱ्या तीन गुंतवणूकदारांनी बिल गेट्स यांची व्यवस्थापन समितीमधून गच्छंती करावी अशी मागणी केलीय. त्यामुळं कंपनीचे सहसंस्थापक अध्यक्ष बिल गेट्स यांना पायउतार व्हावं लागल्याची शक्यता आहे.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Oct 2, 2013, 01:42 PM IST

www.24taas.com , वृत्तसंस्था, न्यूयॉर्क/सिएटल
मायक्रोसॉफ्टमध्ये गुंतवणूक करणाऱ्या तीन गुंतवणूकदारांनी बिल गेट्स यांची व्यवस्थापन समितीमधून गच्छंती करावी अशी मागणी केलीय. त्यामुळं कंपनीचे सहसंस्थापक अध्यक्ष बिल गेट्स यांना पायउतार व्हावं लागल्याची शक्यता आहे.
गेट्‌स यांच्या उपस्थितीमुळे कंपनीमध्ये नव्या योजनांची अंमलबजावणी करण्यात अडथळा निर्माण होत असल्याचा आक्षेप या गुंतवणूकदारांनी घेतला आहे. त्यामुळं मायकोसॉफ्टमधून बिल गेट्स यांचे अधिकार कमी करावेत किंवा त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडावं यासाठी गुंतवणूकदारांचे प्रयत्न सुरू आहेत. शिवाय बालमर यांच्यानंतर कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी शोधण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीमध्ये करण्यात आलेल्या गेट्‌स यांच्या समावेशावरही या गुंतवणूकदारांनी प्रश्नणचिन्ह उपस्थित केलंय. तसंच बिल गेट्स त्यांची पत्नी मेलिंडाच्या नावानं सुरू केलेल्या स्वयंसेवी संस्थेच्या कामाला जास्त वेळ देतात, अशीही तक्रार या गुंतवणुकदारांनी केलीय.
बिल गेट्‌स यांनी ३८ वर्षांपूर्वी मायक्रोसॉफ्ट ही कंपनी संयुक्तरित्या स्थापन केली होती. त्यांचे मायक्रोसॉफ्ट कंपनीत ४.५% पेक्षा जास्त शेअर्स असून कंपनीतील गेट्‌स हे सर्वांत मोठे गुंतवणूकदार आहेत. तर राजीनामा करणाऱ्या तीन गुंतवणुकदरांची मायक्रोसॉफ्टमधील एकूण गुंतवणूक ५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे.
या संपूर्ण प्रकरणाबाबत मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या प्रतिनिधीनं कोणतीही प्रतिक्रिया देण्याचं टाळलंय.
ऑपरेटिंग सिस्टिम तयार करण्याच्या क्षेत्रात अग्रग्रण्य आणि सॉफ्टवेअर निर्मितीच्या क्षेत्रात बलाढ्य असलेल्या मायक्रोसॉफ्टनं २०१२-१३ या आर्थिक वर्षात २२ दशअब्ज डॉलर निव्वळ नफा कमावला होता.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.