‘...पाहीन श्रीमुख आवडींने’

Last Updated: Saturday, June 9, 2012 - 20:40

 www.24taas.com 

अमित जोशी, देहू 

‘तुका म्हणे माझे हेंचि सर्व सुख | पाहीन श्रीमुख आवडीने |’... तुकाराम महाराजांच्या याच ओव्यांमध्ये सध्या सगळं देहू रंगलं आहे. जेष्ठ सप्तमी म्हणजे १० जूनला जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना होत आहे. यावर्षाच्या पालखीत आत्तापर्यंतच्या रेकॉर्डब्रेक संख्येने म्हणजे चार लाख एवढे वारकरी सहभागी होतील, असा अंदाज तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या प्रमुखांनी वर्तवला आहे. गत वर्षाच्या तुलनेत १६ दिंड्या वाढल्या असून आता दिंड्यांची संख्या आता २८८ एवढी झाली आहे.

 

या वेळच्या वारीचे वेगळेपणे कदाचितच वारकऱ्यांच्या लक्षातही येणार नाही. मात्र, पालखी रथामध्ये असलेल्या तुकारामांच्या पादुकांचे दर्शन घेताना ते सर्वसामान्यांच्या लक्षात येईल. कारण, पालखी रथाची उंची ही चार इंचाने कमी करण्यात आली आहे. यामुळे सर्वसामान्यांना पालखी रथातील पादुकांचे दर्शन घेणे सहज शक्य होणार आहे.

 

याचबरोबर ३०० किलो चांदीचे आवरण असलेल्या रथामध्ये काही बदल करण्यात आले आहेत. यामुळे रथाचे वजन ४ टन म्हणजे ४,००० किलोवरुन ते साधारण २७५० किलो म्हणजेच २.७ टन एवढे कमी करण्यात आले आहे. यामुळे पालखी रथ खेचणाऱ्या मानाच्या बैलांच्या जोडीचा त्रास कमी होणार आहे. विशेषतः एखादा चढ असेल तर होणारा त्रास प्रकर्षाने जाणवतो. म्हणूनच यंदा रथाचं वजन कमी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तसंच पालखी रथाचे ब्रेकही बदलले गेले असून आता या रथाला हायड्रोलिक ब्रेक बसवण्यात आलेत. त्यामुळे पालखी रथाचे ब्रेक हे आपात्कालीन परिस्थितीत तात्काळ लागू शकलील आणि बैलांना होणारा त्रासही कमी होईल.

 

तुकाराम महाराजांच्या पालखीसाठी आता वारकऱ्यांचे जथ्थेच्या जथ्थे देहूत दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. मात्र, मंदिर परिसरात काही रस्त्यांच्या दुतर्फा घरं आणि दुकानं रुंदीकरणासाठी तोडण्यात आली आहेत. पाण्याच्या पाईपलाईनसाठी खड्डे करण्यात आले आहेत. त्यामुळे मंदिराकडे येणाऱ्या-जाणाऱ्या वारकऱ्यांना, दिंड्यांना त्रास होणार हे नक्की. बांधकामे तोडण्यासाठी सरकारने वारीचाच मुहुर्त मिळाला का? असा प्रश्न वारकऱ्यांना पडला आहे. मात्र, अशा असंख्य त्रासांना झेलत वारकरी कुरकुर न करता त्यांचा प्रवास सुरु ठेवत रहातात. त्यामुळेच या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करीत अभंगांमध्ये रंगलेल्या सर्व वारकऱ्यांना वेध लागलेत ते तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थानाचे...

 

First Published: Saturday, June 9, 2012 - 20:40
comments powered by Disqus