एक संवाद गानसरस्वती किशोरी आमोणकरांशी…

किशोरी आमोणकर नाव घेताच मन स्वरांमध्ये भिजून जातं....मनात पाझरायला लागतात भूपचे सूर.. सहेला रे.. किती वेळा ऐकले असेल त्याची गणतीच नाही. रात्रीच्या शांत वेळी ऐकलेला संपूर्ण मालकंस… बागेश्री, भीमपलास, तोडी... कितीतरी राग... पुणे विद्यापीठाच्या लॉनवर ऐकलेली सुरांची मैफल… पुण्यात झालेली बहारदार मैफल…

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Apr 22, 2014, 05:06 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
किशोरी आमोणकर नाव घेताच मन स्वरांमध्ये भिजून जातं....मनात पाझरायला लागतात भूपचे सूर.. सहेला रे.. किती वेळा ऐकले असेल त्याची गणतीच नाही. रात्रीच्या शांत वेळी ऐकलेला संपूर्ण मालकंस… बागेश्री, भीमपलास, तोडी... कितीतरी राग... पुणे विद्यापीठाच्या लॉनवर ऐकलेली सुरांची मैफल… पुण्यात झालेली बहारदार मैफल… किशोरी आमोणकर म्हणजे गाभा-यातला पवित्र स्वर.. या स्वरवर्षावात किती भिजलो याची गणतीच नाही.. हा आनंद प्रवास सुरुच आहे...
किशोरीताईंचा जन्म गोव्यातला..10 एप्रिल, 1932चा. कुर्डी हे त्याचं गाव. आई मोगुबाई कुर्डीकर यांनी जीवनभर संगीतसाधना केली.. बालपणापासून किशोरीताईंच्या कानावर सतत सूरच पडत होते.. आईचे बोट धरून त्यांचा संगीत प्रवास सुरु झाला आणि समृद्धच होत गेला.. जयपूर-अत्रोली घराण्याची गायकी त्यांनी वेगळयाच उंचीवर नेली. गोव्यानंतर मुंबई. जयहिंद महाविद्यालयात त्या शिकल्या. गायनातल्या गुरु आई आणि त्यानंतर निवृत्तीबुवा सरनाईक, मोहनराव मालपेकर, संगीतकार हुस्नलाल, अन्वर हुसेन खाँ, अंजनीबाई मालपेकर यांच्याकडूनही किशोरीताईंनी मार्गदर्शन घेतले. पण खरं म्हणजे किशोरीताईंचा स्वर म्हणजे एक ईश्वरी देणगीच आहे..

किशोरीताई कायम दूरस्थ वाटत आलेल्या… दूरच्या मंदिरात शांतपणे समई तेवत असावी आणि तिथून प्रार्थनेचे सूर कानावर येत रहावेत.. सूर ऐकत रहावेसे वाटणारे पण मंदिरात जाण्याची हिंमत होऊ नये तसं काही..आतापर्यंत फक्त मैफलींमध्ये दिसणा-या आणि स्वरांमधूनच भेटणा-या किशोरीताईंशी संवाद साधण्याची संधी मिळाली तीही त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच... 10 एप्रिल, 2014. स्थळ मुंबई.
किशोरीताईंशी बोलतांना जाणवलं ते त्यांच्या व्यक्तिमत्वातलं चैतन्य.. किशोरीताई मंद स्मित करुन प्रत्येकाशी संवाद साधत होत्या..एका मुलीनं ओंजळभर फुलं त्यांना अर्पण केली.. आदरानं नमस्कार केला...
प्रख्यात छायाचित्रकार रघु राय हे किशोरीताईंचे चाहते.. सोबतचं छायाचित्र रघु राय यांचचं... गानसाधनेत मग्न झालेल्या किशोरीताई त्यात दिसतात.. “किशोरी आमोणकर जब गाती है, तब दिल के तार बजने लगते है !,” रघु राय यांची भेट झाली तेव्हा त्यांनी सांगितलं होतं...
किशोरी आमोणकर यांच्या व्यक्तिमत्व वेगळं आहे.. त्यांच्याशी संवाद साधतांना आपल्याला एक तरल आणि पाण्यासारख्या प्रवाही व्यक्तिमत्वाशी बोलल्याचा अनुभव येतो. किशोरीताईंचं वय 83 पण कुठेही वयाचा त्यांच्या व्यक्तिमत्वावर परिणाम झालेला वाटत नाही.. त्याचं व्यक्तिमत्व आणि सूर वाटतात प्राजक्ताच्या फुलासारखे टवटवित ! मला जाणून घ्यायचं होतं ते निसर्ग आणि कलावंत यांच्यात नेमकं काय नातं असतं ते...
“किशोरीताई निसर्ग आणि कलावंत यांच्यात नेमका काय संबंध असतो, “ मी किशोरीताईंना विचारलं.
“ निसर्गात एक चैतन्य तत्व असतं ते कलावंताला प्रेरणा देत असतं.कलाकार हा मनाचा स्वामी. भावना असल्याशिवाय कला होईच शकत नाही. त्यामुळं प्रत्येक कलाकार निसर्गामध्ये रमतो. निसर्गातलं वातावरण, निसर्गाचं अस्तित्व बरंवाईट जे काही आहे ते त्याला प्रभावित करतं..कारण मनाचा निसर्गाशी संबंघ असतो, “ किशोरीताईंनी स्पष्ट केलं.
शास्त्रीय संगीतात दिवस-रात्रीच्या प्रहराला फार मोठं महत्व आहे. प्रत्येक रागाची गाण्याची आणि ऐकण्याची वेळ ठरलेली आहे. प्रहराप्रमाणेच नव्हे तर ऋतुप्रमाणेही राग आहेत... या मागचं तत्व मला समजावून घ्यायचं होतं... रागांचं समयाप्रमाणे आणि ऋतुप्रमाणे राग ऐकण्यावर आणि गाण्यावर किशोरीताईंचा भर असतो.
“ सूर हा निसर्गाचा भाग आहे तो माणसातला नव्हे. निसर्ग म्हणजेच सूर .. जसा माणूस निसर्गाचा घटक आहे तसा सूरही निसर्गाचा भाग आहे. सूरांची आराधना करतांना मनानं निसर्गाशी जवळिक साधली जाते. निसर्गामध्ये ज्याकाही घडामोडी होतात त्यातलेच आपण असतो. निसर्गामध्ये दिवसरात्रीच्या वेळेप्रमाणे, ऋतुप्रमाणे फरक पडत जातो. ते वातावरण त्या त्या वेळेच्या रागांच्या सूरांमध्ये उतरलेलं असतं.. म्हणून काही राग सकाळचे, काही दुपारचे, काही रात्रीचे, काही विविध ऋतुंचे असं आपली परंपरा सांगते.. आणि ती पाळली गेली पाहिजे,”किशोरी आमोणकर सांगत होत्या आणि मी तन्मयतेनं ऐकत होतो.
आता दरवेळी किशोरीताईंचं गाणं ऐकतांना आठवत राहिल ही भेट...
prakashdandge@gmail.com