Crime News : नाशिकमधून शेकडो महिला आणि पुरुष अचानक गायब; बेपत्ता झालेले लोकं गेले कुठे?

राज्यातून बेपत्ता झालेल्या मुलींची आकडेवारी अत्यंत धक्कादायक आहे. खासदार सुप्रिया सुळेंनीही याची दखल घेतली आहे. या बेपत्ता मुलींचं पुढे काय होतं हा प्रश्न सरकारला कसा पडत नाही असा सवाल त्यांनी केलाय.. तसंच तातडीने यावर उपाययोजना करा अशी मागणीही सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे केली आहे.

वनिता कांबळे | Updated: May 11, 2023, 09:55 PM IST
Crime News : नाशिकमधून शेकडो महिला आणि पुरुष अचानक गायब; बेपत्ता झालेले लोकं गेले कुठे? title=

Nashik Crime News :  मार्च महिन्यात राज्यातून 2,200 मुली बेपत्ता झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. रोज सरासरी 18 ते 25 वयाच्या 70 तरुणी बेपत्ता झाल्या आहेत. पुणे, नाशिक, कोल्हापूर, ठाणे, नगरमध्ये बेपत्ता होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. अशातच आता नाशिकमधून  धक्कादायक अपडेट समोर आली होती.  नाशिकमधून शेकडो महिला आणि पुरुष अचानक गायब झाले आहेत. बेपत्ता झाल्याच्या शेकडो तक्रारी पोलिस ठाण्यात नोंद झाल्या आहेत. 

चार महिन्यांत शेकडो अल्पवयीन तसंच प्रौढ बेपत्ता

नाशिक शहर आणि परिसरातून मागील 4 महिन्यांत शेकडो अल्पवयीन तसंच प्रौढ बेपत्ता झाल्याचे गुन्हे, विविध पोलीस ठाण्यांत नोंदवण्यात आलेत. यापैकी 117 गुन्हे हे अल्पवयीन बेपत्ता असल्याबाबतचे आहेत. यात मुलींचं प्रमाण सर्वात जास्त आहे. तर 117 पैकी 76 बेपत्ता अल्पवयीन सापडले असून, बाकीच्यांचा शोध सुरु आहे.  उर्वरित गुन्ह्यांतील बालक हे अद्याप पर्यंत बेपत्ता आहेत.तर प्रौढांचा विचार केला तर या वयोगटातील 127 पुरुष आणि 167 महिला ह्या अद्याप पर्यंत बेपत्ता असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.अशी माहिती नाशिक शहर पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी दिली आहे.

मार्च महिन्यात राज्यातून तब्बल 2200 मुली बेपत्ता 

एकीकडे राज्यासह देशभरात महिलांवरील अत्याचारात वाढ होत असताना दुसरीकडे राज्यात मुली बेपत्ता होण्याचं प्रमाणही वाढलंय. एकट्या मार्च महिन्यात राज्यातून तब्बल 2200 मुली बेपत्ता झाल्यायेत. फेब्रुवारी महिन्यापेक्षा ही आकडेवारी 307ने जास्त आहे. विशेष म्हणजे बेपत्ता होणा-या मुलींमध्ये 18 ते 25 वयोगटातील मुलींचं प्रमाण सर्वाधिक आहे, या वयोगटातील दररोज 70 मुली बेपत्ता होतायेत. त्यामुळे पालकवर्गाची चिंता वाढली आहे. 

यंदाच्या वर्षी जानेवारीत 1600 मुली बेपत्ता असल्याची नोंद झाली तर फेब्रुवारी महिन्यात हा आकडा 1 हजार 810 इतका होता. मार्चमध्ये सर्वाधिक म्हणजे जवळपास 2200 मुली बेपत्ता झाल्याची नोंद आहे. बेपत्ता तरूणींची जिल्हानिहाय आकडेवारी पाहिली तर सर्वाधिक नोंद पुणे जिल्ह्यात आहे. तिथं 228 मुली बेपत्ता झाल्या आहेत. त्याखालोखाल नाशिकमध्ये 161, कोल्हापुरात 114, ठाण्यात 133, अहमदनदरमध्ये 101, जळगावात 81, सांगलीत 82 तर यवतमाळमध्ये 74 मुली बेपत्ता झाल्या आहेत. 

पोलीस रेकॉर्डवरील 1695 मुलींचा अद्याप शोध  लागलेला नाही

अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवणं, लग्नाचं आमिष दाखवून पळवून नेणं, मुलींना वाईट मार्गाला लावणं, नोकरीचं आमिष दाखवून शोषण करणं अशा घटनांमुळे महिलांच्या, तरुणींच्या सुरक्षेचा मुद्दा गंभीर बनलाय. अनेक तरूणांना वैश्याव्यवसायात ढकललं जातय. तर घर सोडून जाणा-या मुलींचं प्रमाणही अधिक आहे. विशेष म्हणजे 2022 च्या मार्च महिन्यातील आकडेवारी पाहिली तर पोलीस रेकॉर्डवरील 1695 मुलींचा अद्याप शोध लागू शकलेला नाही. मग या मुलींचं काय झालं? एवढ्या मोठ्या प्रमाणात मुली बेपत्ता होत असल्याच्या नोंदी असतानाही पोलीस प्रशासन त्यांचा शोध का घेऊ शकलेलं नाही हा देखील निश्चितच संशोधनाचा विषय आहे.