होर्डिंग दुर्घटना: 'उद्धव ठाकरेंचा काय संबंध? सरकार आमचं..'; भुजबळ स्पष्टच बोलले

Mumbai Ghatkopar Hording Bhujbal Back Uddhav Thackeray: घाटकोपरमधील दुर्घटनेवरुन भाजपा आणि पवार गट आमने-सामने आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. 14 मुंबईकरांचं निधन झाल्यानंतर या प्रकरणावरुन राजकारण सुरु झालेलं असतानाच आता सत्ताधारी पक्षांतच मतभेद दिसत आहेत.

स्वप्निल घंगाळे | Updated: May 14, 2024, 01:13 PM IST
होर्डिंग दुर्घटना: 'उद्धव ठाकरेंचा काय संबंध? सरकार आमचं..'; भुजबळ स्पष्टच बोलले title=
पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना केलं विधान

Mumbai Ghatkopar Hording Bhujbal Back Uddhav Thackeray: मुंबईतील घाटकोपर येथे सोमवारी (13 मे रोजी) बेकायदेशीर होर्डिंग पडून 14 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. अवकाळी पाऊस आणि वेगवान वाऱ्यांमुळे 120 बाय 120 स्वेअर फूट आकाराचं हे होर्डिंग बाजूच्या पेट्रोल पंपावर पडून शेकडो वाहने या होर्डिंगच्या मलब्याखाली अडकली. एकूण 74 जणांना या मलब्यातून सुखरुपणे बाहेर काढण्यात आलं. मात्र आता या होर्डिंग दुर्घटनेनंतर राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. या दुर्घटनेसाठी अशाप्रकारे एवढं मोठं होर्डिंग उभं करण्यासाठी कोणी परवानगी दिली आणि यामागे कोणते राजकीय कनेक्शन आहेत यासंदर्भात आरोप प्रत्यारोप सुरु असतानाच राज्यातील मंत्री तसेच अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी चक्क उद्धव ठाकरेंची पाठराखण केल्याचं पाहायला मिळालं आहे. भारतीय जनता पार्टीकडे या होर्डिंग अपघातानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं जात असतानाच भुजबळांनी मात्र उद्धव ठाकरेंची बाजू घेतली आहे. 

रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांचा गुन्हा काय?

नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना भुजबळांना मुंबईतील होर्डिंग दुर्घटनेसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना भुजबळ यांनी, "एमएसआरडीसी वगैरे अश्या ज्या संस्था आहेत त्यांच्याकडे यासंदर्भातील जबाबादरी असते. जे घडलं ते दुर्दैवी असून झालेले मृत्यू वेदनादायी आहेत," अशी प्रतिक्रिया नोंदवली.

नक्की वाचा >> घाटकोपर होर्डिंग दुर्घटना: 14 मुंबईकरांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला भावेश भिडे आहे तरी कोण?

पुढे बोलताना, "एअर पोर्टकडे जाताना असे अनेक हॉर्डिंग दिसतात. हे होर्डिंग समांतर हवे होते पण ते रस्त्यावर आहेत. त्यांचं वजन सुद्धा भरपूर आहे. हे सगळे होर्डिंग अनधिकृत आहेत. याची चौकशी झाली पाहिजे," असं भुजबळ म्हणाले. तसेच पुढे बोलताना, "बेकायदेशीर आहे मग वेळ कशाला काढता?" असा प्रश्न उपस्थित केला. "सगळ्याच संस्थांनी याची काळजी घेतली पाहिजे की बेकायदेशीर होर्डिंग उभे राहणार नाहीत. रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांचा गुन्हा काय? शासन 5 लाख देईल? म्हणजे संपलं का? जितका आकार असायला हवा होता त्या पेक्षा खूप मोठा आकार त्याचा होता. चौकशी केली पाहिजे," असं भुजबळ म्हणाले. 

भाजपा आमदाराने ठाकरेंवर साधला निशाणा

दरम्यान, घाटकोपरचे भाजपाचे आमदार राम कदम यांनी या प्रकरणावरुन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर आरोप केला आहे. अपघातग्रस्त होर्डिंग ज्या 'इगो मिडीया प्रायव्हेट लिमिडेट' कंपनीच्या मालकीचे आहे त्या कंपनीचा मालक भावेश भिडेबरोबरचा उद्धव ठाकरेंचा एक फोटो पोस्ट करत राम कदम यांनी 'अनधिकृत होर्डिंगला संरक्षण कोणाचे होते हे या चित्रावरून स्पष्ट होते' असे म्हटले आहे. 

नक्की वाचा >> घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेचं ठाकरे कनेक्शन? स्थानिक आमदाराने शेअर केलेल्या फोटोने खळबळ

भुजबळ ठाकरेंची बाजू घेत काय म्हणाले?

भुजबळ यांना भावेश भिडे आणि उद्धव ठाकरे तसेच 'मातोश्री'शी संबंध असल्याचा उल्लेख करत प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी उद्धव ठाकरेंची पाठराखण केल्याचं पाहायला मिळालं. "सरकार आमचं आहे. महानगर पालिका सुद्धा सध्या आमचीच आहे. उद्धव ठाकरेंचा काय संबंध?" असा प्रतिप्रश्न राम कदम यांनी केलेल्या आरोपावरुन केला आहे. "असे अनेक लोक असतात. व्यापारी सगळ्यांकडे येतात. मिठाई घेऊन येतात आणि फोटो काढतात. राजकारण आणण्याचा प्रयत्न करू नये," असं म्हणत भुजबळ यांनी सत्तेत ज्या भाजपासोबत आहेत त्याच पक्षाच्या आमदाराला घरचा आहेर दिला आहे.