Ramadan 2024 : चंद्रदर्शनासह मंगळवारपासून पहिला रोजा, सहर इफ्तारपासून ईदपर्यंत पाहा सर्व तारखा

Ramadan 2024 Moon Sighting : सौदी अरेबियामध्ये 10 मार्चच्या संध्याकाळी रमजानचा चंद्र दिसल्यानंतर तेथील मुस्लिम बांधवांनी सोमवार, 11 मार्चपासून उपवास करण्यास सुरुवात केली. यासह भारत एक दिवसानंतर म्हणजेच 12 मार्च रोजी रमजानचा पहिला दिवस पाळणार आहे. 

सौरभ तळेकर | Updated: Mar 11, 2024, 08:39 PM IST
Ramadan 2024 : चंद्रदर्शनासह मंगळवारपासून पहिला रोजा, सहर इफ्तारपासून ईदपर्यंत पाहा सर्व तारखा  title=
Ramadan 2024 Sehri and Iftar Timing Calendar

Ramadan 2024 Date in India : इस्लाम धर्मातील पवित्र अशा रमजान महिन्याला सुरूवात झाली आहे. मुस्लीम बांधव ज्यासाठी मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात, अशा रमजान महिन्याचं वेळापत्रक आता समोर आलंय. चंद्रदर्शनासह (Ramadan 2024 Moon Sighting) मंगळवारपासून पहिला रोजा सुरू होणार आहे.  सौदी अरेबियामध्ये 10 मार्चच्या संध्याकाळी रमजानचा चंद्र दिसला, त्यामुळे तेथील बांधव 11 मार्चपासून उपवास करण्यास सुरुवात करतील, तर भारतात 12 मार्च रोजी रमजानचा पहिला दिवस पाळणार आहे. रमजान इस्लामच्या पाच स्तंभांपैकी एक आहे. रमजानच्या महिन्यात मुस्लिम दररोज सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत रोजा नावाचा कडक उपवास पाळतात.

इस्लामिक कॅलेंडरच्या आठव्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच शाबान महिन्याच्या शेवटच्या दिवशी हिलाल म्हणजेच अर्धचंद्र दिसल्यानंतर रमजान महिन्याची सुरुवात होते, असं मानलं जातं. अशातच आता रमजानला सुरूवात होत असल्याने मुस्लीम बांधवांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. सकाळी सूर्योदयापूर्वी फजरच्या अजानने उपवास सुरू होतो, याला सेहरी असं म्हणतात. तर दिवसभर उपवास केल्यानंतर संध्याकाळी नमाज अदा केली जाते आणि खजूर खाऊन उपवास सोडला जातो, याला इफ्तार असं म्हणतात. 

पाहा वेळापत्रक

भारतात रमजानची सुरूवात : १२ मार्च, रविवार
रमजान संपतो: ९ एप्रिल, मंगळवार
लैलात अल-कद्र: ६ एप्रिल, शनिवार
ईद अल-फितर: ९ एप्रिलची संध्याकाळ (मंगळवार) – १० एप्रिल (बुधवार) (तात्पुरती तारीख)

इतर देशात पहिला रोजा कधी?

सौदी अरेबिया तसेच संयुक्त अरब अमिराती, ब्रिटन, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये उद्या, सोमवार, 11 मार्च रोजी रमजान 2024 चा पहिला उपवास पाळला जात आहे. तर भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि इतर दक्षिण आशियाई देशांमध्ये रमजान एक दिवसानंतर सुरू होईल.

मुस्लिम मान्यतेनुसार, रमजान महिना इतका पवित्र मानला जातो कारण याच महिन्यात प्रेषित मोहम्मद साहिब यांना इस्लामचा पवित्र ग्रंथ कुराण शरीफ लैलातुल-कदरच्या निमित्ताने मिळाला होता. त्यामुळे या महिन्यात मुस्लीम बांधव जास्तीत जास्त वेळ अल्लाहची उपासना करण्यात घालवतात.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती धार्मिक शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास याला दुजोरा देत नाही.)