४ बॉलमध्ये ४ विकेट, अफगाणिस्तानच्या राशिद खानचा विश्वविक्रम

अफगाणिस्तानच्या राशिद खाननं विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. 

Updated: Feb 25, 2019, 10:03 PM IST
४ बॉलमध्ये ४ विकेट, अफगाणिस्तानच्या राशिद खानचा विश्वविक्रम title=

देहादून : अफगाणिस्तानच्या राशिद खाननं विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. आयर्लंडविरुद्धच्या आंतरराष्ट्रीय टी-२० मॅचमध्ये राशिद खाननं ४ बॉलमध्ये ४ विकेट घेतल्या आहेत. आंतरराष्ट्रीय टी-२०मध्ये अशी कामगिरी करणारा राशिद खान हा पहिला बॉलर ठरला आहे. तर एकूण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असं रेकॉर्ड याआधी श्रीलंकेच्या लसीथ मलिंगानं केलं होतं. २००७ सालच्या वर्ल्ड कपमध्ये मलिंगानं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ४ बॉलमध्ये ४ विकेट घेतल्या होत्या. राशिद खानच्या या कामगिरीमुळे अफगाणिस्तानचा तिसऱ्या टी-२० मॅचमध्ये ३२ रननी विजय झाला. तसंच अफगाणिस्ताननं ही सीरिज ३-०नं खिशात घातली.

राशिद खाननं या मॅचमध्ये २७ रन देऊन ५ विकेट घेतल्या. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये राशिद खाननं दुसऱ्यांदा ५ विकेट घेतल्या आहेत. तसंच आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये हॅट्रिक घेणारा राशिद खान हा सातवा खेळाडू ठरला आहे.

बॅटिंगसाठी आलेल्या अफगाणिस्तानच्या टीमने २० ओव्हरमध्ये २१० रन केल्या. मोहम्मद नबी याने सर्वाधिक ८१ रन केले. तर ओपनर हजरत्तुला झाझाईने ३१ रनची खेळी केली. या दोघांचा अपवाद वगळता कोणत्याच अफगाणिस्ताच्या खेळाडूला मोठी खेळी करता आली नाही. अफगाणिस्ताच्या इनिंगला चांगली सुरुवात झाली. हजरत्तुला झाझाई आणि उस्मान घाणी या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ४६ रनची भागीदारी केली. यानंतर ठराविक टप्प्याने विकेट जात होते. आयर्लंडकडून  बॉयड रैंकिन याने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या.

अफगाणिस्तानने विजयासाठी दिलेल्या २११ रनचे पाठलाग करायला आलेल्या आयर्लंडलची चांगली सुरुवात झाली होती, पण त्यांची पहिली विकेट ३२ रन असताना गेली. पॉल स्टर्लिंग १० रन करुन आऊट झाला. यानंतर आलेल्या एंडी बालबिर्नीच्या सोबतीने केविन ओब्रायननं आयर्लंडचा डाव सावरला. या दोघांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी ९६ रनांची महत्वपूर्ण भागीदारी झाली. या भागीदारीने टीमच्या डाव सावरला. टीमचा स्कोअर १२८ असताना एंडी बालबिर्नी ४७ रन करुन आऊट झाला. यानंतर आयर्लंडची टीम पत्त्यासारखी कोसळली. एकापाठोपाठ एक विकेट जाऊ लागले. अफगाणिस्तानचा स्पीनर राशीद खानने हॅट्रिक घेत आयर्लंडच्या विजयाच्या प्रयत्नांवर पाणी फेरले. आयर्लंडला २० ओव्हरमध्ये ८ विकेटच्या मोबदल्यात १७८ रन करत्या आल्या.