Legend and her son! फक्त एका कॅप्शनमुळे फोटो जगभरात व्हायरल; ग्रँडमास्टर प्रज्ञाननंदही व्यक्त, पण ती तरुणी कोण?

बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत (FIDE Chess World Cup) अंतिम फेरी गाठणारा ग्रँडमास्टर प्रज्ञाननंद (R Praggnaandhaa) याची संपूर्ण देशभरात चर्चा सुरु आहे. सोशल मीडियावर (Social Media) त्याच्यासह त्याच्या आईचे फोटो व्हायरल होत आहेत. पण यातील एक फोटो कॅप्शनमुळे प्रचंड व्हायरल झाला आहे.   

शिवराज यादव | Updated: Aug 27, 2023, 02:10 PM IST
Legend and her son! फक्त एका कॅप्शनमुळे फोटो जगभरात व्हायरल; ग्रँडमास्टर प्रज्ञाननंदही व्यक्त, पण ती तरुणी कोण? title=

बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत (FIDE Chess World Cup) अंतिम फेरी गाठणारा ग्रँडमास्टर प्रज्ञाननंद (R Praggnaandhaa) हे नाव गेल्या काही दिवसांपासून प्रत्येक भारतीयाच्या ओठावर आहे. जगातील अव्वल, मानांकित खेळाडूंना पराभूत करत चेस वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये दाखल झाल्याने त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. दुर्दैवाने अंतिम सामन्यात प्रज्ञाननंदला अव्वल प्रतिस्पर्धी मॅग्नस कार्लसनकडून पराभूत व्हावं लागलं. दरम्यान, स्पर्धा सुरु असताना प्रज्ञाननंदचे अनेक फोटो व्हायरल होत होते. या फोटोंमध्ये त्याची आई प्रत्येक सामन्यात त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचं दिसत होतं. अझरबैजानमधील बाकू येथे झालेल्या स्पर्धेत प्रज्ञाननंदसह त्याची आईही उपस्थित होती. यातील एक फोटो मात्र प्रचंड व्हायरल झाला आहे. याचं कारण या फोटोची कॅप्शन ठरली आहे. कॅप्शनमुळे या फोटोला तब्बल 3.9 मिलियन व्ह्यू मिळाले आहेत. 

चेस फोटोग्राफर मारिया एमेलिनोवाने (Maria Emelianova) हा फोटो काढला आहे. तिने प्रज्ञाननंद आणि त्याच्या आईसोबत सेल्फी काढला होता. हा फोटो ट्विटरला शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये प्रज्ञाननंदच्या आईला दिग्गज म्हणजेत Legend म्हटलं आहे. 'selfied with a legend and her son' असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं असून, थोडक्यात आईचं कौतुक केलं आहे. यामुळे नेटकऱ्यांना ही कॅप्शन प्रचंड आवडली असून, फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. 

प्रज्ञाननंदलादेखील हा फोटो शेअर करण्याचा मोह आवरलेला नाही. त्यानेही ट्विटरला हा फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

प्रज्ञाननंदला टायब्रेकरमध्ये मॅग्नस कार्लसेनकडून अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला. यामुळे विश्वविजेता होण्याचं त्याचं स्वप्न थोडक्यात हुकलं. भारताचा पहिला ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंदने यावर व्यक्त होताना थकव्यामुळे त्याचा पराभव झाला असल्याचं म्हटलं आहे. 

"प्रज्ञाननंदने जबरदस्त कामगिरी केली आहे. त्याने चांगली लढत दिली आणि टायब्रेकरपर्यंत पोहोचणे हा एक चांगला परिणाम होता. स्पर्धेच्या शेवटी, थकवा आला. त्याने अलीकडेच अनेक मोठे खेळ खेळले आहेत. यामध्ये हंगेरीमधील वर्ल्डकप आणि ग्लोबल चेस लीग यांचा समावेश आहे. हे सिद्ध करतं की हा एकतर्फी निकाल नाही आणि मला विश्वास आहे की आम्ही एक नवीन स्टार पाहत आहोत. त्याचे भविष्य खूप उज्ज्वल आहे. त्याच्यासमोर आता वर्ल्ड चॅम्पिअनशिपच्या फायनलमध्ये पात्र होण्याचं ध्येय आहे," असं आनंदने सांगितलं. 

प्रज्ञनंधाने स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले, परंतु त्याच्या प्रभावी कामगिरीच्या जोरावर त्याने FIDE Candidates स्पर्धेसाठी त्याची पात्रता निश्चित केली.