सुरु होण्यापूर्वीच IPL 2020 ला गालबोट

भारत- चीन संघर्षाचा इथंही फटका

Updated: Aug 4, 2020, 09:12 PM IST
सुरु होण्यापूर्वीच IPL 2020 ला गालबोट title=

मुंबई : भारत आणि चीनच्या राजकीय तणावाच्या परिस्थितीचा फटका आता थेट क्रीडा क्षेत्रालाही बसताना दिसत आहे. ज्याचे पडसाद यंदाच्या वर्षीच्या आयपीएलला बसण्याची चित्र आहे. Vivo या चिनी मोबाईल कंपनीनं यंदाच्या इंडियन प्रिमीयर लीग अर्थात आयपीएल स्पर्धेच्या यंदाच्या पर्वासाठी टायटल स्पॉन्सर्स होण्यापासून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे. यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाशी रितसर चर्चा सुरु असल्याचं कळत आहे.

स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच यंदाच्या वर्षी आयपीएलमध्ये vivo टायटल स्पॉन्सर्स म्हणून माघार घेताना दिसलं तरीही, भारत आणि चीन या दोन्ही राष्ट्रांमध्ये संबंध चांगले झाल्यास २०२१-२३ या तीन वर्षांसाठी कंपनी नवा करार करु शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

बीसीसीआयशी संलग्न असणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना दिलेल्या माहितीनुसार सध्याच्या घडीला बीसीसीआयचे पदाधिकारी, अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शाह आणि कंपनीच्या सदस्यांची महत्त्वाची चर्चा सुरु आहे. या चर्चेचा मिळणारं वळण पाहता यंदाच्या वर्षी आयपीएलसाठी मुख्य प्रायोजक म्हणून Vivo दिसणार नसल्याची दाट शक्यता आहे.

लडाखमधील गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक संघर्षानंतर दोन्ही देशांतील तणावाची परिस्थिती पाहता या कराराबद्दल पुनर्विचार करण्याची भूमिका बीसीसीआयकडून मांडण्यात आली होती. त्यामुळं आता यंदाच्या आयपीएलची एकंदर आखणी चर्चेचा विषय ठरत असून, मुख्य प्रायोजक म्हणून कोणतं नाव पुढं येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.