IND vs PAK: याला म्हणतात कॉन्फिडन्स ! पाकविरुद्धची रणनिती सांगताना विराट म्हणाला, 'मला वाटतं...'

India vs Pakistan: भारत आणि पाकिस्तानचा संघ 2019 च्या वर्ल्डकप स्पर्धेनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच मैदानात उतरणार आहेत. विराटने या सामन्याबद्दल प्रतिक्रिया नोंदवली आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Sep 1, 2023, 04:13 PM IST
IND vs PAK: याला म्हणतात कॉन्फिडन्स ! पाकविरुद्धची रणनिती सांगताना विराट म्हणाला, 'मला वाटतं...' title=
भारत आणि पाकिस्तान 2019 नंतर पहिल्यांदाच एकदिवसीय सामना खेळणार

India vs Pakistan in Asia Cup 2023: आशिया चषक 2023 स्पर्धेमध्ये संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलेला सामना अवघ्या एका दिवसांवर आहे. 2 सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ एकमेकांविरोधात श्रीलंकेच्या मैदानामध्ये उतरतील. या सामन्याआधी दोन्ही संघ जोरदार तयारी करत आहेत. पाकिस्तानने आशिया चषक स्पर्धेचा पाहिला सामना 238 धावांनी जिंकला. नेपाळविरुद्धच्या सामन्यामध्ये पाकिस्तानची गोलंदाजी आणि फलंदाजीही फारच उत्तम झाली. पाकिस्तानी संघ भारतीय संघाला विजयासाठी झुंजवू शकतो अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

भारताने यापूर्वीचे तिन्ही सामने जिंकलेत 

भारतीय संघाची आघाडीच्या फळीतील शुभमन गील, रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारख्या फलंदाजांना पाकिस्तानच्या गोलंदाजीचा सामना करावा लागणार आहे. माजी कर्णधार विराट कोहलीने या हाय व्होल्टेज सामन्याआधी पाकिस्तानच्या गोलंदाजांविरोधात सर्वोत्तम कामगिरी करावी लागणार आहे असं म्हटलं आहे. भारताने पाकिस्तानविरुद्धचे यापूर्वीचे तिन्ही सामने जिंकले आहेत. मात्र भारत आणि पाकिस्तानमध्ये शेवटचा एकदिवसीय सामना 2019 च्या विश्वचषक स्पर्धेत झाला होता.

कोहली भारत-पाकिस्तान सामन्याबद्दल काय म्हणाला?

सामान्यपणे अशा मोठ्या सामन्याआधी कोणताही संघ त्यांची रणनिती सांगत नाही. मात्र विराटने आत्मविश्वासाने याबद्दल सामन्याआधीच भाष्य केलं आहे. कोहलीने 'स्टार स्पोर्ट्स'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये, "मला वाटतं की त्यांची गोलंदाजी ही त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. त्यांच्याकडे सामन्यावर प्रभाव पाडणारे गोलंदाज आहेत. या गोलंदाजांकडे कौशल्याच्या आधारावर सामन्याचा निकाल बदलण्याची क्षमता आहे. त्यामुळेच त्यांच्या गोलंदाजांचा सामना करताना सर्वोत्तम कामगिरी करण्याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे," असं म्हटलं आहे. कोहली एकदिवसीय सामन्यांमध्ये उत्तम कामगिरी करत आहे. मागील वर्षी 7 सप्टेंबरनंतर त्याने एकदिवसीय क्रिकेटच्या 13 सामन्यामध्ये 554 धावा केल्या असून त्याची सरासरी 50.36 इतकी आहे.

...म्हणून एवढा दिर्घकाळ खेळतोय

मागील काही काळापासूनच्या आपल्या कामगिरीबद्दल बोलताना विराटने, "मी केवळ हे समजून घेण्याचा प्रयत्न करतो की मी माझा खेळ अधिक उत्तम कसा करु शकतो. दर दिवशी, दर सराव सत्राला, दर वर्षी, दर सत्रात माझा हाच प्रयत्न असल्यानेच मी एवढ्या दिर्घ काळापासून उत्तम खेळ करण्यात आणि संघासाठी चांगली कामगिरी करण्यात यशस्वी ठरतोय," असं म्हटलं.

...तर तुम्ही संतुष्ट होता आणि मेहनत सोडता

"अशी मानसिकता ठेवली नाही तर तुम्हाला सातत्याने चांगली कामगिरी करता येणार नाही. तुमची कामगिरी हेच तुमचं मुख्य लक्ष्य असेल तर तुम्ही संतुष्ट होता आणि मेहनत करत नाही," असंही विराट म्हणाला.