Ind vs Pak Video: रोहितला भेटल्यानंतर बाबर आझमला आठवली रोहितची लेक; म्हणाला...

Asia Cup 2023 Rohit Sharma Babar Azam About Samaira Ritika Sajdeh: सरावानंतर रोहित शर्मा हॉटेलवर परत जात असतानाच त्याला बाबर आझम भेटला आणि या दोघांमध्ये चर्चा झाली.

स्वप्निल घंगाळे | Updated: Sep 2, 2023, 12:11 PM IST
Ind vs Pak Video: रोहितला भेटल्यानंतर बाबर आझमला आठवली रोहितची लेक; म्हणाला... title=
रोहित शर्मा आणि बाबारची भेट झाली

Asia Cup 2023 Rohit Sharma Babar Azam About Samaira Ritika Sajdeh: भारत आणि पाकिस्तानदरम्यान आशिया चषक स्पर्धेतील सामना आज श्रीलंकेतील कॅण्डी शहरामधील मैदानावर खेळवला जाणार आहे. मागील वर्षी टी-20 वर्ल्डकपनंतर पहिल्यांदाच हे दोन्ही संघ आमने-सामने येणार आहेत. दोन्ही संघ काही दिवसांपूर्वीच श्रीलंकेत दाखल झाले असून कसून सराव करत आहेत. सामान्यपणे भारत विरुद्ध पाकिस्तान सामना म्हटल्यावर खुन्नस, एकमेकांना दिलेले लूक्स, आरडाओरड असं काहीसं वातावरण मैदानामध्ये दिसून येतं. पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या या दोन्ही संघांचा सामना खेळाडूंबरोबरच क्रिकेट चाहत्यांची धडधडही वाढवतो. मात्र आशिया चषकामधील सामन्याच्या एकदिवस आधी सरावादरम्यान अगदी वेगळेचे क्षण कॅमेरात कैद झाले. यावेळी भारताचा स्फोटक फलंदाज विराट कोहली आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी पाकिस्तानी खेळाडूंची भेट घेतली. या भेटीच्या वेळी बाबर आझमला चक्क रोहित शर्माची मुलगी समायरा आठवली. दोघांमधील चर्चेचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. 

विराट अनेकांना भेटला

रोहित शर्मा आणि विराटबरोबरच सर्व भारतीय खेळाडूंनी सामन्याच्या एकदिवस आधी नेट्समध्ये कसून सराव केला. या सरावानंतर विराटने अनेक खेळाडूंची भेट घेतली. आधी मैदानात आणि नंतर ड्रेसिंग रुमच्या प्रवेशद्वाराजवळ विराट पाकिस्तानी खेळाडूंना भेटला. सरावानंतर विराट ड्रेसिंग रुमजवळ उभा असताना त्याला काही पाकिस्तानी खेळाडू भेटले. यामध्ये फलंदाज आणि गोलंदाजांचाही समावेश होता. यावेळी विराटने पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफलाही भेटला. टी-20 विश्वचषकाच्या सामन्याने विराटने सरळ रेषेत हारिस रौफला षटकार लगावला होता. हा षटकार आजही चर्चेत आहे. विराटला पाहताच हारिस रौफने, "जिथे जातो तिथे कोहली कोहली कोहली..." असं ऐकायला मिळत असल्याचं सांगितलं आणि विराटला मिठी मारली.

विराटने हारिसबरोबरच पाकिस्तानच्या ड्रेसिंग रुमच्या दरवाजाजवळ शादाब खानलाही भेटला. विराटने ड्रेसिंग रुमसमोर शाहीन शाह आफ्रिदीबरोबर हस्तांदेलन केलं. या पाकिस्तानी खेळाडूंबरोबर संवाद साधताना विराट अनेकदा जोरात हसतानाही कॅमेरात कैद झाला.

हे फोटो पाहाच >> India vs Pakistan: 'त्या' Six मुळे डोकं धरणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूने विराटला मिठीत घेतलं अन्...

रोहित आणि बाबरची कुटुंबावर चर्चा

दरम्यान, दुसरीकडे रोहित शर्मा सरावानंतर हॉटेलवर जाताना पाकिस्तानी कर्णधार बाबर आझम आणि इमाम-उल-हकला भेटला. या दोघांमध्ये झालेल्या संवादाचा व्हिडीओ पाकिस्तानी क्रिकेट बोर्टाने पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये बाबर आझमने रोहितची मुलगी समायरा आणि कुटुंबाबद्दल विचारलं. त्यावर रोहितने समायराची शाळा सुरु असल्याचं सांगितलं. "स्कूल चल रहा है. किसी को तो घर रहना पडेगा" असं उत्तर रोहितने बाबारला दिलं. त्यावर इमाम-उल-हक रोहितला तुझे कुटुंबीय नाही आले का? असा प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना त्यावर रोहित, "नाही यार, कुटुंब नाही आलं. वर्ल्डकपला येतील ते. तिथे पण त्यांचं येणं-जाणं सुरु राहील," असं म्हटलं. 

या व्हिडीओला लाखोंच्या संख्येनं व्हूज आणि लाईक्स मिळाले आहेत.