Asia Cup 2023 : एशिया कप 2023 स्पर्धेसाठी 17 खेळाडूंच्या भारतीय संघाची घोषणा, 'या' खेळाडूंना संधी

India Squad For Asia Cup 2023: येत्या 30 ऑगस्टपासून पाकिस्तानात होणाऱ्या एशिया कप स्पर्धेसाठी अखेर भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाचे चीफ सिलेक्टर अजीत आगरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत 17 खेळाडूंच्या नावाची घोषणा करण्यात आली. 

राजीव कासले | Updated: Aug 21, 2023, 03:28 PM IST
Asia Cup 2023 : एशिया कप 2023 स्पर्धेसाठी 17 खेळाडूंच्या भारतीय संघाची घोषणा, 'या' खेळाडूंना संधी title=

Indian Squad for Asia Cup 2023: एशिया कप 2023 स्पर्धेसाटी भारतीय क्रिकेट बोर्डाने (BCCI) टीम इंडियाची (Team India) घोषणा केली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात सतरा खेळाडूंच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. दुखापतीमुळे गेले काही महिने संघाबाहेर असलेल्या केएल राहुल (KL Rahul) आणि श्रेयस अय्यरची (Shreyas Iyer) भारतीय संघात एन्ट्री झाली आहे. तर युवा फलंदाज तिलक वर्मालाही (Tilak Verma) संघात संधी देण्यात आली आहे. विकेटकिपर आणि फलंदाज संजू सॅमसनची (Sanju Samson) स्टॅंडबाय खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे. येत्या 30 ऑगस्टपासून पाकिस्तान आणि श्रीलंकेत एशिया कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेपूर्वीची ही रंगीत तालिम असणार आहे. 

रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध 2 सप्टेंबरला होणार आहे. श्रीलंकेच्या कँडीमध्ये हा सामना रंगणार आहे. त्यानंतर 4 सप्टेंबर नेपाळविरुद्ध भारतीय संघाचा दुसरा सामना होईल. एशिया कप स्पर्धेत भारत, पाकिस्तान ाणि नेपाळ एकाच ग्रुपमध्ये आहेत. यंदा एशिया कप स्पर्धेचं आयोजन पाकिस्तान करत असून हायब्रिड मॉडेलवर आधारीत ही स्पर्धा होणार आहे. 

एशिया कपसाठी भारताचा संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव , ईशान किशन (विकेटकीपर), अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, प्रसिद्ध कृष्णा

स्टँडबाय खेळाडू - संजू सॅमसन

एशिया कप स्पर्धेचं स्वरुप
एशिया कप स्पर्धेत अंतिम सामन्यासह एकूण 13 सामने खेळवले जाणार आहेत. यातले चार सामने पाकिस्तानात खेळवले जाणार आहेत. तर अंतिम सामन्यासह इतर 9 सामने श्रीलंकेत रंगणार आहेत. भारतीय संघ अंतिम सामन्यापर्यंत पोहचल्यास एकूण 6 सामने खेळेल. यंदा एशिया कप स्पर्धा एकदिवसीय फॉर्मेटमध्ये होणार आहे. ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा भारतासाठी महत्त्वाची ठरणार आहे. 

एशिया कप स्पर्धेत भारताचं वर्चस्व
आतापर्यंत झालेल्या एशिया कप स्पर्धेत भारताचं वर्चस्व राहिलं आहे. एशिया कप स्पर्धेचं एकूण 15 हंगाम झाले आहेत. यात भारताने सर्वाधिक सात वेळा विजेतेपद पटकावलं आहे. (1984, 1988, 1990–91, 1995, 2010, 2016, 2018). यानंतर श्रीलंकेने 6 जेतेपद पटकावलं आहे. (1986, 1997, 2004, 2008, 2014, 2022), तर पाकिस्तान दोनवेळा चॅम्पियन बनली आहे. (2000, 2012)

एशिया कप स्पर्धेचं वेळापत्रक
30 ऑगस्ट : पाकिस्तान vs नेपाळ - मुलतान
31 ऑगस्ट: बांग्लादेश vs श्रीलंका - कँडी 
2 सप्टेंबर : भारत vs पाकिस्तान - कँडी
3 सप्टेंबर : बांग्लादेश vs अफगाणिस्तान - लाहोर
4 सप्टेंबर: भारत vs नेपाल - कँडी
5 सप्टेंबर : श्रीलंका vs अफगाणस्तान - लाहोर

6 सप्टेंबर : A1 Vs B2 - लाहोर 
9 सप्टेंबर : B1 vs B2 - कोलंबो  
10 सप्टेंबर : A1 vs A2 - कोलंबो  
12 सप्टेंबर : A2 vs B1 - कोलंबो  
14 सप्टेंबर : A1 vs B1 - कोलंबो 
15 सप्टेंबर : A2 vs B2 - कोलंबो 
17 सप्टेंबर : फाइनल - कोलंबो