Assembly Election Results Sanatana Dharma: रविवारी तेलंगण, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले. यापैकी तेलंगण वगळता इतर तिन्ही राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीने अभूतपूर्व यश मिळवलं. राजस्थान, मध्य प्रदेशबरोबरच छत्तीसगडमध्येही भाजपाने बहुमताचा आकडा सहज गाठला. चारपैकी राजस्थान, छत्तीसगडसारखी महत्त्वाची राज्य काँग्रेसने गमावली आणि केवळ तेलंगणमध्ये काँग्रेसला एकहाती सत्ता मिळाली. या विजयानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहामध्ये सेलिब्रेशन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अन्य महत्त्वाच्या नेत्यांसहीत नवी दिल्लीमधील भारतीय जनता पार्टीच्या मुख्य कार्यालयामध्ये सेलिब्रेशनला हजेरी लावली. पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणामधून हा निकाल म्हणजे 2024 मधील विजयाची हॅट-ट्रिक होणार असा विश्वास व्यक्त केला. या विजयानंतर सर्वच स्तरांमधून प्रतिक्रिया नोंदवल्या जात असतानाच एका माजी क्रिकेटपटूने काँग्रेसला मिळालेल्या अपयशाचा संबंध थेट सनातन धर्माशी जोडला आहे. या क्रिकेटपटूने केलेली पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.
तामिळनाडूच्या मंत्रीमंडळातील मंत्री तसेच डीएमकेचे नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी सप्टेंबर महिन्यामध्ये सनातन धर्मावरुन भारतीय जनता पार्टीवर टीका केल्याने दक्षिण भारताबरोबरच देशातील राजकारणामध्ये मोठी खळबळ उडाली होती. सनातन धर्मावरुन पूर्वी टीका केल्याने वादात सापडलेल्या उदयनिधी स्टॅलिन यांनी नवीन संसदेच्या उद्घटानानंतरही भाजपावर टीकास्त्र सोडलं होतं. "नवीन संसद भवनाचं उद्घाटन करण्यात आलं. त्यांनी (भाजपाने) उद्घाटनासाठी तामिळनाडूमधील आदिनम संतांना बोलवलं पण भारताच्या राष्ट्रपतींना आमंत्रित केलं नाही. राष्ट्रपतींना आमंत्रित न करण्यामागील कारण म्हणजे त्या एक विधवा असून आदिवासी समाजातील आहेत. हाच सनातन धर्म आहे का? मूर्मू यांना संसदेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात आधीही आमंत्रित करण्यात आलं नाही आणि सध्या सुरु असलेल्या विशेष अधिवेशनामध्येही त्यांना आमंत्रित करण्यात आलं नाही," असं उदयनिधी स्टॅलिन म्हणाले होते.
सनातन धर्मासंदर्भातील मुद्दा तेलंगण, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडच्या विधानसभा निवडणुकीमध्येही चांगलाच गाजला. याच सर्व पार्श्वभूमीवर रविवारी चार महत्त्वाच्या राज्यांपैकी तीन राज्यांमध्ये भाजपाने विजय मिळवल्यानंतर माजी क्रिकेटपटूने सनातन धर्माचा अपमान केल्यानेच भाजपाविरोधकांचा पराभव झाल्याचा दावा केला आहे. हा दावा करणारा क्रिकेटपटू आहे भारताचा माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद! "सनातन धर्माचा अपमान केल्याचे परिणाम होणारच. भारतीय जनता पार्टीला मोठ्या विजयानिमित्त हार्दिक शुभेच्छा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि अमित शाहांच्या उत्तम नेतृत्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालं आहे. तळागाळातील पक्ष कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाचा हा निकाल आहे," असं व्यंकटेश प्रसादने आपल्या एक्स अकाऊंटवरुन म्हटलं आहे.
Abusing Sanatana Dharma was bound to have it’s consequences .
Many congratulations to the BJP for a landslide victory. Just another testimony of the amazing leadership of Prime Minister @narendramodi ji & @AmitShah & great work by the party cadre at grassroot levels…— Venkatesh Prasad (@venkateshprasad) December 3, 2023
प्रसादच्या या पोस्टला 11 हजारांहून अधिक वेळा शेअर करण्यात आलं आहे. शेकडोच्या संख्येनं लोकांनी या पोस्टवर प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. तामिळनाडूमध्ये सनातन धर्माचा अपमान झाला तेव्हा काँग्रेसने स्टॅलिन कुटुंबाविरोधात काहीही भूमिका घेतली नाही. याचा हिंदी भाषिक राज्यांमध्ये परिणाम होणार नाही असं त्यांना वाटलं पण घडलं उलट, असं एकाने म्हटलं आहे.