Bushfire Bash: ब्रायन लाराची तुफान फटकेबाजी, ११ बॉलमध्ये ३० रन

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेले दिग्गज क्रिकेटपटू पुन्हा मैदानात उतरले.

Updated: Feb 9, 2020, 06:36 PM IST
Bushfire Bash: ब्रायन लाराची तुफान फटकेबाजी, ११ बॉलमध्ये ३० रन title=

मेलबर्न : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेले दिग्गज क्रिकेटपटू पुन्हा मैदानात उतरले. ब्रायन लारा, रिकी पाँटिंग, एडम गिलख्रिस्ट, युवराज सिंग हे खेळाडू बुशफायर बॅशची मॅच खेळण्यासाठी आमने-सामने होते. मेलबर्नमध्ये झालेल्या या मॅचमध्ये वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू ब्रायन लारा पुन्हा जुन्या ढंगात दिसला.

पाँटिंग-११ कडून खेळताना लाराने ११ बॉलमध्ये सर्वाधिक ३० रन केले. लाराच्या खेळीमध्ये ३ फोर आणि २ सिक्सचा समावेश होता. नवव्या ओव्हरमध्ये लारा रिटार्यड आऊट होऊन माघारी परतला.

ऑस्ट्रेलियाच्या जंगलात लागलेल्या आगीत प्राणी आणि नागरिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. या आगीत प्रभावित झालेल्यांना मदत म्हणून ही चॅरिटी मॅच खेळवण्यात आली. पाँटिंग-११ आणि गिलख्रिस्ट-११ या टीममध्ये ही मॅच झाली. पाँटिंग-११ ने या मॅचमध्ये पहिले बॅटिंग करुन १० ओव्हरमध्ये ५ विकेट गमावून १०४ रन केले.

पाँटिंग-११च्या या आव्हानाचा पाठलाग करताना गिलख्रिस्ट-११ टीमला हा सामना १ रनने गमवावा लागला. गिलख्रिस्ट-११ कडून शेन वॉटसन आणि एन्ड्र्यू सायमंड्सने आक्रमक खेळी केली. वॉटसनने ९ बॉलमध्ये ३० रन केले, यामध्ये २ फोर आणि ३ सिक्स होते. सायमंड्सने १३ बॉलमध्ये ३ फोर आणि २ सिक्सच्या मदतीने २९ रन केले.

रिकी पाँटिंगच्या टीममध्ये जस्टीन लँगर, मॅथ्यू हेडन, एलिस विलानी, ब्रायन लारा, फोबे लिचफील्ड, ब्रॅड हॅडिन, ब्रेट ली, वसीम अक्रम, डेन क्रिस्टियन, लुक हॉज होते. सचिन तेंडुलकर या टीमचा प्रशिक्षक होता.

एडम गिलख्रिस्टच्या टीममध्ये शेन वॉटसन, ब्रॅड हॉज, युवराज सिंग, एलेक्स ब्लॅकवेल, एन्ड्र्यू सायमंड्स, कोर्टनी वॉल्श, निक रिवॉल्ट, पीटर सीडल, फवाद अहमद, कॅमरुन स्मिथ होते. ऑस्ट्रेलियाच्या टेस्ट टीमचा कर्णधार टीम पेन या टीमचा प्रशिक्षक होता.