"धमकी दिल्याने जबाब बदलला", साक्षी मलिकचा बृजभूषण सिंग यांच्यावर आरोप, आता अखेर पीडित कुटुंबच आलं समोर, म्हणाले...

Sakshi Malik on Brij Bhushan Sharan Singh: भारतीय कुस्तीपटू साक्षी मलिक (Sakshi Malik) आणि तिच्या पतीने एक व्हिडीओ प्रसिद्ध करत खळबळजनक आरोप केला आहे. कुटुंबाला धमक्या मिळाल्यानेच अल्पवयीन कुस्तीपटू तरुणीने जबाब बदलला असा दावा त्यांनी केला आहे. यानंतर मुलीच्या वडिलांनीच यावर प्रतिक्रिया दिली आहे.   

शिवराज यादव | Updated: Jun 18, 2023, 07:49 PM IST
"धमकी दिल्याने जबाब बदलला", साक्षी मलिकचा बृजभूषण सिंग यांच्यावर आरोप, आता अखेर पीडित कुटुंबच आलं समोर, म्हणाले... title=

Sakshi Malik on Brij Bhushan Sharan Singh: भारतीय कुस्तीपटू साक्षी मलिक (Sakshi Malik) आणि तिच्या पतीने एक व्हिडीओ प्रसिद्ध करत खळबळजनक आरोप केला आहे. कुटुंबाला धमक्या मिळाल्यानेच अल्पवयीन कुस्तीपटू तरुणीने भारतीय कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष बृजभूषण सिंग (WFI President) जबाब बदलला असा दावा त्यांनी केला आहे. यानंतर मुलीच्या वडिलांनीच यावर प्रतिक्रिया दिली आहे. साक्षी मलिकने केलेला दावा त्यांनी फेटाळून लावला आहे. आपल्या कुटुंबाला कोणतीही धमकी मिळालेली नसून, भीतीपोटी आपण जबाब बदललेला नाही असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. अल्पवयीन कुस्तीपटूने बृजभूषण सिंग यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. 

बृजभूषण सिंग यांच्याविरोधात आंदोलन करणारी साक्षी मलिक आणि तिचा पती सत्यवर्त कार्दियन यांनी एक व्हिडीओ नुकताच प्रसिद्ध केला होता. यामध्ये त्यांनी एक खळबळजनक आरोप केला होता. धमक्या मिळाल्याने अल्पवयीन मुलीने आपला जबाब बदलला असा त्यांचा दावा आहे. 

दरम्यान मुलीच्या वडिलांनी म्हटलं आहे की, आपल्या कुटुंबाला कोणतीही धमकी मिळालेली नसल्याने मुलीवर आपला जबाब बदलण्यासाठी कोणताही दबाव नव्हता. यावेशळी त्यांनी साक्षी मलिकला कोणत्या आधारे हे वक्तव्य केलं हे स्पष्ट करण्यास सांगितलं आहे. 

"जे गरजेचं आहे ते आम्ही केलं आहे. आमच्या कुटुंबाला धमक्या मिळालेल्या दाव्यांमध्ये कोणतंही तथ्य नाही," असं मुलीच्या वडिलांनी म्हटलं आहे.

व्हिडिओमध्ये, साक्षी मलिकने खुलासा केला की अल्पवयीन कुस्तीपटूने दोनदा जबाब दिला होता. प्रथम भारतीय दंड संहितेच्या कलम 161 अंतर्गत पोलिसांना आणि नंतर कलम 164 अंतर्गत दंडाधिकार्‍यांसमोर हा जबाब नोंदवण्यात आला होता. पण नंतर धमक्या मिळत असल्याने तिने आपला जबाब बदलला. 

दिल्ली पोलिसांकडून बृजभूषण सिंग यांना क्लीन चीट

दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात बृजभूषण सिंग यांना क्लीन चीट दिली आहे. दिल्ली पोलिसांनी बृजभूषण सिंग यांच्याविरोधातील आरोपांवर चार्जशीट दाखल केलं आहे. यामध्ये दिल्ली पोलिसांनी  पुराव्याअभावी अल्पवयीन मुलीने केलेली तक्रार रद्द करण्याची शिफारस केली आहे. याप्रकरणी दिल्ली कोर्टात 4 जुलैला सुनावणी होणार आहे. 

साक्षी मलिक, विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांच्यासह भारतातील अनेक प्रसिद्ध कुस्तीपटूंनी ब्रृजभूषण सिंग यांच्यावर सात कुस्तीपटूंविरुद्ध लैंगिक छळाचा आरोप करून त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे, त्यापैकी एक कुस्तीपटू अल्पवयीन आहे. सरकारने WFI प्रमुखांवर कारवाई करण्याचं आश्वासन दिल्यानंतर कुस्तीपटूंनी आपलं आंदोलन मागे घेतलं होतं.