आयपीएलच्या आगामी 15 व्या मोसमात खेळणार की नाही? धोनी म्हणाला....

धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटनंतर आयपीएलमधूनही निवृत्ती घेणार, अशी जोरदार चर्चा रंगली होती. 

Updated: Nov 20, 2021, 08:51 PM IST
आयपीएलच्या आगामी 15 व्या मोसमात खेळणार की नाही? धोनी म्हणाला.... title=

मुंबई : महेंद्रसिंह धोनीने (Mahendra Singh Dhoni) आपल्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्सला (Chennai Super Kings) आयपीएलच्या 14 व्या मोसमाचं (IPL 2021) विजेतेपद मिळवून दिलं. या 14 व्या मोसमानंतर धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटनंतर आयपीएलमधूनही निवृत्ती घेणार, अशी जोरदार चर्चा रंगली होती. धोनी आयपीएलच्या आगामी 15 व्या मोसमात खेळणार की नाही, क्रीडावर्तुळातही अशा चर्चा रंगल्या होत्या. या सर्व मुद्द्यावरुन स्वत: धोनीने उत्तर दिलं आहे. क्रिकेट चाहत्यांना धोनी आयपीएलमध्ये खेळताना दिसणार की नाही, याबाबत धोनीने उत्तर दिलं आहे. (Chennai super king captain mahendra singh dhoni give reaction on his participation in ipl 2022)

धोनी काय म्हणाला?

"आयपीएलच्या 15 व्या मोसमाला आता वेळ आहे. आता नोव्हेंबर सुरु आहे आणि 15 व्या मोसामाचं आयोजन हे एप्रिल 2022 मध्ये होणार आहे". या उत्तरातून धोनीने अजूनही निवृत्तीबाबत विचार केला नसल्याचा किंवा गडबडीत निर्णय घेणार नसल्याचं स्पष्ट केलंय. चेन्नईत सीएसकेच्या विजयी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमादरम्यान धोनी बोलत होता. 

अखेरचा टी 20 सामना चेन्नईत खेळण्याची इच्छा

"धोनीने या व्यतिरिक्त अखेरचा सामना चेन्नईत खेळण्याची इच्छाही बोलून दाखवली. "अखेरचा टी 20 सामना चेन्नईमध्ये खेळायचाय, तो सामना पुढील वर्षी होवो किंवा 5 वर्षांनी. मी माझा शेवटचा वनडे सामना सामना रांचीत खेळलो होतो. आता अखेरचा टी 20 सामना हा चेपॉकमध्ये खेळायचाय", असं धोनी म्हणाला. 

आयपीएलमधील यशस्वी कर्णधार

धोनी रोहित शर्मानंतर आयपीएलमध्ये दुसरा सर्वात यशस्वी कर्णधार राहिला आहे. धोनीने आपल्या नेतृत्वात चेन्नईला 4 वेळा विजेतेपद मिळवून दिलं आहे. तर तब्बल 9 वेळा अंतिम सामन्यात पोहचवलं आहे. धोनीने चेन्नईला आपल्या नेतृत्वात 2010, 2011, 2018 आणि 2021 मध्ये आयपीएलचं विजेतेपद मिळवून दिलंय. 

आयपीएलचा 15 वा मोसम भारतात

दरम्यान या कार्यक्रमादरम्यान बीसीसीआय सचिव जय शाह यांनी आयपीएलच्या 15 व्या मोसमाचं आयोजन कुठे करण्यात येणार, याची माहिती दिली. आयपीएलचं आगामी 15 वं पर्व हे भारतात खेळवण्यात येणार असल्याचं शाह यांनी स्पष्ट केलं. तसेच या मोसमात 2 नवीन संघ सहभागी होणार असल्याने आणखी चुरस वाढेल, असंही शाह यांनी नमूद केलं.