कौतुकास्पद! Chess World Cup Final पराभूत झाल्यानंतर प्रज्ञाननंद म्हणतो, 'मी जिंकलो नाही पण...'

Praggnanandhaa After Losing Chess World Cup Final: अंतिम सामन्यात भारताच्या 18 वर्षीय आर. प्रज्ञाननंदने पहिल्या दोन्ही डावात 32 वर्षीय कार्लसनला कडवी झुंज दिली. पहिले दोन्ही डाव अनिर्णित राहिले होते. यानंतर टायब्रेकर सामन्यात दोन डाव खेळण्यात आले.

स्वप्निल घंगाळे | Updated: Aug 25, 2023, 07:37 AM IST
कौतुकास्पद! Chess World Cup Final पराभूत झाल्यानंतर प्रज्ञाननंद म्हणतो, 'मी जिंकलो नाही पण...' title=
विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात झाला पराभूत

Praggnanandhaa After Losing Chess World Cup Final: विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदला उपविजेत्या पदावर समाधान मानावं लागलं. अंतिम सामन्यामध्ये अव्वल मानांकित मॅग्नस कार्लसनने आर. प्रज्ञाननंदचा पराभव केला. या पराभवानंतरही वयाच्या 18 व्या वर्षी भारताचं नाव बुद्धीबळाच्या क्षेत्रात जागतिक स्तरावर नेणाऱ्या आर. प्रज्ञानंदवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून अनेक मान्यवरांनी आर. प्रज्ञानंदचं अभिनंदन केलं आहे. असं असतानाच पराभूत झाल्यानंतर आर. प्रज्ञानंदने नोंदवलेल्या पहिल्या प्रतिक्रियेने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या प्रतिक्रियेमधून वयाच्या 18 व्या वर्षी आर. प्रज्ञानंदला स्वत:च्या विजयापेक्षा खेळाची अधिक काळजी असल्याचं दिसून येत आहे.

पराभूत झाल्यानंतर काय म्हणाला आर. प्रज्ञानंद

आर. प्रज्ञानंदने भारतीय लोक बुद्धीबळाकडे अधिक काळजीपूर्वक पाहू लागतील असं मत व्यक्त केलं आहे. बाकू येथे झालेल्या विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर पीटीआय या वृत्तसंस्थेशी आर. प्रज्ञानंदने संवाद साधला. "अंतिम सामन्यामध्ये पोहोचलो याचं फार समाधान आहे. मी आज जिंकू शकलो नाही. मात्र बुद्धीबळामध्ये असं घडत असतं," अशी प्रतिक्रिया आर. प्रज्ञानंदने नोंदवली. "हे या खेळासाठी फार चांगलं आहे. मला फार आनंद आहे की एवढे लोक हा खेळ पाहत आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात मुलं हा खेळ पाहायला येत आहेत. यामुळे लोकांना बुद्धीबळ खेळण्याची प्रेरणा मिळेल. माझ्यामते यामुळे लोक भारतातील बुद्धीबळ क्षेत्राकडे अधिक लक्षपूर्व पाहतील. ही फार चांगली बाब आहे," असं आर. प्रज्ञानंद म्हणाला आहे.

मी थकलोय, मला आराम करायचा आहे

मागील 2 महिन्यांपासून सातत्याने बुद्धीबळ स्पर्धा खेळत असलेल्या आर. प्रज्ञानंदने, "मी सातत्याने खेळत आहे. त्यामुळेच मला या स्पर्धेसाठी तयारी करण्यास वेळ मिळाला नाही. मला माझ्या विरोधात खेळणाऱ्यांचा खेळ पाहण्यासाठी केवळ एका आठवड्याचा वेळ मिळाला. मला वाटलं नव्हतं की मी अंतिम सामन्यापर्यंत पोहोचले. पण या कामगिरीवर मी फार समाधानी आहे," असं सांगितलं. "मी फार थकलो आहे. मला आराम करायचा आहे. सोमवारपासून पुन्हा नवीन स्पर्धा सुरु होत आहे," असंही आर. प्रज्ञानंदने सांगितलं. 

थोडक्यात हुकलं विश्वविजेता पद

प्रज्ञाननंद विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेचा अंतिम सामना जिंकला असता तर विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा तो विश्वनाथ आनंद यांच्यानंतरचा दुसरा भारतीय खेळाडू ठरला असता. तीन दिवस चाललेल्या अंतिम सामन्यात 4 डावांनंतर निकाल लागला. 18 वर्षीय प्रज्ञाननंदने पहिल्या दोन्ही डावात 32 वर्षीय कार्लसनला कडवी झुंज दिली. पहिले दोन्ही डाव अनिर्णित राहिले होते. मंगळवारी पहिला डाव झटपट बरोबरीत सोडवला गेला होता. प्रज्ञाननंदने कार्लसनला 35 चालीतच डाव बरोबरीत सोडविण्यास भाग पाडले होते. तर दुसरा डावही अनिर्णित राहिला होता. 30 चालीनंतर दोघांनीही बरोबरी साधली होती. यानंतर गुरुवारी सामना पार पडला आणि टायब्रेकर डावात निर्णय झाला. टायब्रेकर सामन्यात दोन डाव खेळण्यात आले. पहिल्या डावात प्रज्ञाननंदचा पराभव झाला. दुसरा डाव ड्रॉ झाल्याने कार्लसनला विजयी घोषित करण्यात आलं.